साताऱ्यातील अमृताचा पुण्यात पुराच्या पाण्यात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मनमिळाऊ स्वभावामुळे अमृताच्या निधनाने मंगळवार तळ्यानजीकच्या निवासस्थानी शोककाळा पसरली होती.
 

सातारा ः पुण्यात काल (ता. 25) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुचाकी वाहून जाण्याच्या घटना घडल्या. धायरी येथील पुलावर आलेल्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेल्याने मूळच्या साताऱ्यातील अमृता आनंद सुदामे (वय 37, मूळ रा. मंगळवार तळे, सातारा, सध्या रा. नांदेड सिटी, पुणे) यांचा मृत्य झाला. 

पुण्यात काल मुसळधार पाऊस झाला. धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याने अमृता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साताऱ्यातील प्रख्यात वकील (कै.) विलासराव देशपांडे यांच्या त्या कन्या होत. त्यांचे शालेय शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल, तसेच महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात झाले. 12 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या आई यादेखील त्यांच्याबरोबर पुण्यातच राहतात. मनमिळाऊ स्वभावामुळे अमृताच्या निधनाने मंगळवार तळ्यानजीकच्या निवासस्थानी शोककाळा पसरली होती.

त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होती. रात्री दहा वाजता त्या घरी येण्यास निघाल्या; परंतु अपेक्षित वेळेत न आल्याने नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना तब्बल आठ तासांनंतर सनसिटीच्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrita's death in Pune flood water