‘अमूल’ २ एप्रिलपासून कोल्हापुरात

- निवास चौगले
शनिवार, 4 मार्च 2017

कोल्हापूर - दुग्ध व्यवसायात आंतरराष्ट्रीय ‘ब्रॅंड’ ठरलेल्या अमूल दुधाची विक्री कोल्हापुरात २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरात विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी २१ विक्रेते भागनिहाय निश्‍चित करण्यात आले आहेत. या विक्रेत्यांमार्फत ग्राहकांना ‘अमूल’चे दूध मिळणार आहे.  

कोल्हापूर - दुग्ध व्यवसायात आंतरराष्ट्रीय ‘ब्रॅंड’ ठरलेल्या अमूल दुधाची विक्री कोल्हापुरात २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरात विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी २१ विक्रेते भागनिहाय निश्‍चित करण्यात आले आहेत. या विक्रेत्यांमार्फत ग्राहकांना ‘अमूल’चे दूध मिळणार आहे.  

महाराष्ट्रात दूध संकलनाला उच्च न्यायालयाकडून परवानगी घेतल्यानंतर ‘अमूल’ने जोरदार मोहीम उघडली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सहकार आयुक्तांनी त्यांना संकलनाची परवानगी दिली. त्यानंतर लगेच अमूलकडून कोल्हापुरात सर्वेक्षण करून बंद पडलेले दूध संघ, चिलिंग सेंटर यांची माहिती घेण्यात आली. त्यात संबंधित संस्थेचे संकलन किती, त्यांना ‘गोकुळ’, ‘वारणा’कडून मिळणारे फायदे कोणते याची माहिती घेतली होती. 
राज्यात पुणे व आसपासच्या परिसरात ‘अमूल’चे संकलन सुरू आहे. सध्या त्या भागात किमान १ लाख ५० हजार लिटर दूध संकलन केले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या पूर्व भागांवर ‘अमूल’ने अधिक लक्ष केंद्रित केले होते. पहिल्या टप्प्यात संकलन सुरू न करता विक्रीच्या माध्यमातून पहिल्यांदा ग्राहक मिळवण्याचा निर्णय ‘अमूल’ने घेतला. त्या दृष्टीने शहरात विक्रेते शोधण्यात आले. २१ विक्रेत्यांना ‘अमूल’ने एजन्सी दिली. १ लाख रुपये अनामत भरून त्यांना विक्रीसाठी दूध उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

२ एप्रिलपासून प्रत्यक्ष दुधाची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जे २१ विक्रेते नेमण्यात आले, त्यांच्यामार्फत छोट्या दुकानांत, बेकरीत किंवा दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या सेंटरमध्ये हे दूध पोचवले जाणार आहे. मुख्य विक्रेत्याला ६० पैसे, तर किरकोळ विक्रेत्याला दीड रुपये कमिशन मिळणार आहे. ‘गोकुळ’चे दूध ग्राहकांना प्रतिलिटर ५० रुपये दराने विकले जाते. ‘अमूल’च्या दुधाची किंमत यापेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे. 

राज्याचे एकूण दूध संकलन
एकूण संकलन - १३ कोटी ७९ लाख लिटर
सहकारी संघ संकलन - 
५ कोटी ३२ लाख लिटर
खासगी संकलन - ८ कोटी १४ लाख लिटर
संकलनात खासगीचा वाटा - ५५ टक्के
संकलनात सहकारचा वाटा - ४० टक्के

दृष्टिक्षेपात ‘अमूल’ 
संस्थापक - डॉ. वर्गीस कुरियन
गुजरातमध्ये एकच ब्रॅंड
६३ जिल्हा संघांची शिखर संस्था
वार्षिक उलाढाल - सुमारे ४० हजार कोटी रुपये
दैनंदिन दूध संकलन - २ कोटी ९० लाख लिटर
महाराष्ट्रात इतर संघांपेक्षा प्रतिलिटर चार रुपये जादा दर
संचालकांना मर्यादित अधिकार
तीन महिन्यांतून एकदाच संचालकांची बैठक
संचालकांना वाहनांची सुविधा नाही
संपूर्ण कारभार प्रशासनाच्या ताब्यात
५ देशांत उपपदार्थांची विक्री 
महाराष्ट्रात ५ ते ६ हजार कोटी गुंतवण्याची तयारी
राज्यात १५ ठिकाणी जमिनीचा खरेदी व्यवहार पूर्ण

Web Title: amul milk in kolhapur at 2 april