अन्‌ चारही पोरं सापडली... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 एप्रिल 2020

यपावाडी (जि. सांगली) येथील चार अल्पवयीन मुले नेहमीप्रमाणेच आज सकाळी घरातून फिरण्यासाठी गेली, ती परतलीच नाहीत.

आटपाडी : यपावाडी (जि. सांगली) येथील चार अल्पवयीन मुले नेहमीप्रमाणेच आज सकाळी घरातून फिरण्यासाठी गेली, ती परतलीच नाहीत. घरच्या लोकांनी आणि ग्रामस्थांनी मुलांच्या शोधासाठी गाव आणि विहिरी पिंजून काढल्या. अनेकाकडे चौकशी केली. शेवटी पालकांनी पोलिस स्टेशन गाठले. सायंकाळी चारही मुले मुलाणकीत सापडली तेव्हा पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 

अधिक माहिती अशी, यपावाडी येथील ओंकार काकडे (वय 14), शुभम काकडे (वय 11), अथर्व काकडे (वय 9) आणि आणखी एक (नाव समजले नाही) अशी चार मुले नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. 13) सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती दररोजच सकाळी फिरायला जात होती. वेळ झाली तरी ती घरी परतली नाहीत. तेव्हा घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.

गावभर बातमी झाली. साऱ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन गाव आणि रस्त्यावरील विहिरी पिंजून काढल्या. दुपारच्या दरम्यान मुलांच्या फोटोसह ही बातमी सोशल मीडियावर पसरवली. अनेक उलट-सुलट चर्चा लोकांच्यात सुरू झाली होती. सायंकाळ झाली तरी मुलांचा तपास लागत नव्हता. त्यामुळे मुलांच्या पालकांची धडधड वाढली. शेवटी पालकांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

दुसरीकडे शोध सुरूच होता आणि सोशल मीडियावर बातमी पसरल्यामुळे काहीना ही मुलं आटपाडी येथील मुलाणकीत एका शेतात आढळून आली. फिरत फिरत मुलांची वाट चुकली. ती भयभीत झाली. संचारबंदीत पोलिसांच्या भीतीमुळे मुलांनी एका रानातच तळ ठोकला. ग्रामस्थांनी या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... and all four Children found