... आणि सुरू झाला पक्ष्यांचा किलबिलाट!

 ... and the birds began to chirp!
... and the birds began to chirp!

इस्लामपूर : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी, पक्ष्यांचा मृत्यूदरही वाढतच असतो. अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड, तसेच वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्‍वभूमीवर इस्लामपूर (जि. सांगली)येथे पक्षीमित्र अश्‍पाक आत्तार यांनी आपल्या घराजवळ पक्ष्यांसाठी स्वतः घरटी तयार केली आहेत. पक्षीही त्यात दाखल झाले आहेत. पेशाने शिक्षक असणाऱ्या अत्तार यांनी लॉकडाउनचा असा सदुपयोग करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. 

एरवी सतत अंगणात येणारी, एवढ्याश्‍या पाण्यात स्नान करणारी आणि वेळप्रसंगी जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी अलीकडे गायबच झालीय. निसर्गसाखळीत प्राणी-पक्ष्यांचं असलेलं महत्त्व ओळखून त्यांचे संगोपन गरजेचे आहे. अत्तार यांनी तयार केलेल्या घरट्यांवर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण, "चलो आज आदमी से फरिश्‍ते बन जाये, एक पक्षी की जान बचाए; पक्षी है खेतों की शान', असे अनेक शुभसंदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती केलीय.

या रंगीबिरंगी घरट्यांमुळे त्यांच्या अंगणामध्ये पक्ष्यांचा राबता वाढला असून किलबिलाट सुरू झाला आहे. त्यांच्या अंगणातील फळे, फुलझाडांवर दिवसभर हे पक्षी विसावलेले असतात. त्यांच्या पत्नी गुलजार अत्तार यादेखील अंगणामध्ये दररोज सकाळी धान्याची रांगोळी काढून पक्ष्यांच्या घासाची तजवीज करत आहेत. मातीच्या भांड्यात पाणीही ठेवल्याने चिमणीसह लाल बुडाचा पक्षी, कबुतर, कोकीळ या पक्ष्यांचा राबता वाढला आहे. 

बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर, रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्ष्यांसाठी अंगणात गच्चीवर घरटे बांधून, थोडं अन्न पाणी ठेवून पक्ष्यांची संख्या वाढवता येईल, हा बोध यातून घेण्याची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com