ऊस वाहतुकीला बैलगाड्यांच्या जागी अंगद गाड्या

पोपट पाटील
Thursday, 19 November 2020

ऊस वाहतुकीत यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढ आहे. उसाच्या पट्ट्यात बैलगाडीने ऊस वाहतुक हळूहळू कमी होत आहे. बैलगाडीच्या जागी अंगद ट्रॅक्‍टर आला आहे.

इस्लामपूर : ऊस वाहतुकीत यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढ आहे. उसाच्या पट्ट्यात बैलगाडीने ऊस वाहतुक हळूहळू कमी होत आहे. बैलगाडीच्या जागी अंगद ट्रॅक्‍टर आला आहे. कारखान्याचे गळीत हंगाम सुरु होताच प्रत्येक गावांच्या वेशीवर पहाटे बैल गाड्या येताना दिसत. बैलांची दुडकी चाल, घुंगरांचा आवाज, गाडीच्या चाकांच्या धावा रस्त्यावर आदळून होरा आवाज, नंतर टायरच्या गाड्या पण त्यांचं आदळणं ऐकू येई. परंतु आता बैलगाडीची जागा अंगद ट्रॅक्‍टरने घेतलीय. घुंगरू ऐवजी ट्रॅक्‍टरचे हॉर्न, चित्रपट गीतांचा आवाज ऐकू येतोय. 

शेतीतील यांत्रिकीकरण वाढल्यामुळे मशागतीची बहुतांश कामे लहान, मोठ्या ट्रॅक्‍टरने केली जात आहेत. बैलांच्या साह्याने मशागत कमी होत आहे. शेतकऱ्यांना बैल जोडी सांभाळणे परवडेना झालेय. 
साखर कारखाना परिसराच्या आसपासचा ऊस बैलगाडीने आणला जात असे. एका गाडीत जास्तीत जास्त अडीच टन ऊस भरला जात असे. याच बैलगाडीला टार बसवून "अंगद' नाव देण्यात आले. सुरूवातीला अंगदमधूनही ऊस ओढला जाई. नंतर बैलाऐवजी छोटा ट्रॅक्‍टर जोडून ऊस वाहतूक सुरू झाली. आठ-नऊ टनापर्यंत ऊस वाहतूक होते. 

काही ठिकाणी एका ट्रॅक्‍टरला दोन गाड्या जोडल्या जातात. या जुगाडामुळे संपूर्ण कुटुंबाला एकत्रत काम मिळत आहे. तरूण ट्रॅक्‍टर चालवतात. बाकीचे सदस्य ऊस तोडणी व भरणीचे काम करीत. बैलगाडी पेक्षा या अंगद गाडीतून ऊस वाहतुकीकडे कल वाढला आहे. 

बैल सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. ऊस वाहतुकीला मर्यादा पडत. शासनाकडून ट्रॅक्‍टरसाठी अनुदान मिळतं. कारखान्याकडून अंगद गाडी भाड्याने मिळते. बैलाच्या जागी ट्रॅक्‍टर आल्याने नऊ टन ऊसाची वाहतूक सुरू झाली. 
- गणेश थोटे, मुकादम, शहागड, ता. अंबड, जि. जालना 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angad carts instead of bullock carts for transporting sugarcane