मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार फौजदारी

Animal owners will be charged with crimes
Animal owners will be charged with crimes

नगर : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जनावरांच्या प्रश्‍नावर नगरसेवक गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना आज घेराव घातला. नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर अधिकारीही निरुत्तर झाले. आयुक्‍त भालसिंग यांनी कोंडवाडा विभागाला रस्त्यांवरील मोकाट जनावरांना पकडण्याचे आदेश दिले. या जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच पुन्हा हीच जनावरे पकडली गेल्यास त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्‍तांनी दिले आहेत.


"मोकाट जनावरांचा ठिय्या आता अमरधाम'मध्ये या शीर्षकाखाली "सकाळ'ने आज बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत विचारणा करण्यासाठी नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, विनित पाऊलबुधे, अविनाश घुले, सुनील त्रिंबके, डॉ. सागर बोरुडे, मनोज कोतकर, प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, संजय चोपडा, अजिंक्‍य बोरकर, अमोल चितळे आदी महापालिकेत आयुक्‍तांच्या दालनात गेले. तेथे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. अनिल बोरगे, कोंडवाडा विभागप्रमुख रमेश वाळेकरही उपस्थित होते.

भोसले यांनी सुरवातीला मोकाट जनावरांची समस्या आयुक्‍तांकडे मांडली. आयुक्‍तांनी, आज सकाळीच बोरगे यांना मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. यावर भोसले यांनी जनावरांचे मालक ओळखणार कसे? त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार कसे? असे प्रश्‍न उपस्थित केले. पकडलेल्या जनावरांना टॅगिंग करावे, म्हणजे दंडात्मक कारवाईनंतर सोडून दिलेली जनावरे समजतील, अशी सूचना घुले यांनी मांडली. भागानगरे यांनी, मोकाट कुत्र्यांनी काल सारसनगर भागात एकाला जखमी केल्याचे सांगितले. मोकाट जनावरे पकडण्यासाठी कर्मचारी कोणी नेमले आहेत? ते कोण आहेत, असा प्रश्‍न विचारला. वारे म्हणाले, की पूर्वी कोंडवाडा विभागात महापालिकेचे कर्मचारी होते. त्यांना ट्रॅक्‍टर, पिंजरा दिला होता. वाहतुकीला अडथळा ठरणारी जनावरे जप्त करून ठेवली जात. ही जनावरे सोडण्यासाठी मालकांवर दंडात्मक कारवाई होई. ही पद्धत आता दिसत नाही.

बोरगे यांनी सांगितले, की उदय म्हसे व इतर लोकांनी जनावरे पकडून विकल्याची तक्रार आल्याने खासगी संस्थांना काम देण्यात येत आहे. त्यावर वारे म्हणाले, ""कुंपणच शेत खात आहे. हे कार्यकर्ते पोसायचे काम आहे. म्हसे व इतरांवर त्याच वेळी कारवाई का झाली नाही?''
आयुक्‍तांनी जनावरे पकडण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे चार ट्रॅक्‍टर नेमण्याचे आदेश दिले. पाऊलबुधे यांनी पकडलेली जनावरे सोडवायला आलेल्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. भोसले व वारे यांनी जनावरे पकडण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराला देण्याची मागणी केली. त्यानुसार मोठी जनावरे पकडण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले. मोठ्या जनावरांबरोबरच कुत्री व डुकरांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी पवार व पाऊलबुधे यांनी केली. रस्त्यावर चारा व अन्न टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी संजय चोपडा यांनी केली.

29 दिवसांची हजेरी; काम मात्र सहाच दिवस!
बाळासाहेब पवार यांनी दंडाच्या पावत्या दाखविण्याची मागणी केली. यात महापालिकेतील कोंडवाडा विभागात 12 कर्मचाऱ्यांनी 29 दिवस हजेरी लावली. त्यातील सहा दिवसच काम करून 40 जनावरे पकडल्याची बिले काढल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेच्या मोकाट जनावरांसंदर्भातील कारवाईची खातेनिहाय चौकशी करा, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी नगरसेवक विनित पाऊलबुधे व निखिल वारे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com