कोरोना योद्‌ध्या बाधीत; अंकलखोप गाव स्वयंस्फुर्तीने पाच दिवस बंद 

वैभव यादव
Monday, 27 July 2020

​अंकलखोप : येथील एका 30 वर्षीय कोरोना योद्‌ध्याला कोरोनाची लागण झाली. बाधीत सांगली येथील शासकिय रूग्णालयात सेवा देत आहे.

अंकलखोप : येथील एका 30 वर्षीय कोरोना योद्‌ध्याला कोरोनाची लागण झाली. बाधीत सांगली येथील शासकिय रूग्णालयात सेवा देत आहे. ही व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे समजताच भिलवडी, नागठाणेसह परिसर कोरोनाच्या धास्तीने हादरला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज पलूस तालुक्‍यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ झाली. दुधोंडी, ब्रम्हनाळ, नागठाणे, बांबवडेसह माळवाडी, खटावमध्ये कोरोना बाधीत सापडल्यामुळे तालुक्‍यामध्ये कोरोनाच्या धास्तीने पुन्हा एकदा खळबळ माजली. 

अंकलखोप येथील व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे समजताच तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, भिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास धेंडे यांनी तात्काळ भेट देऊन, बाधीत व्यक्तीच्या कुटुंबातील व जवळच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले.

सदर परिसर सील करण्यात आला. कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला. येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने तात्काळ गावांत औषध फवारणी केली आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अनावश्‍यक कारणासाठी, डबल सिट प्रवास करणारे, विना मास्क रस्त्यावरून व सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीस बावीसशे रुपये दंड करणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

सरपंच अनिल विभुते, सुनिता चौगुले, ग्रामसेवक संग्रामसिंह सुतार, तलाठी जयवंत सुर्यवंशी, मंडल अधिकारी राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, कोरोना बाधीताच्या संपर्कातील व कुटुंबातील चार सदस्यांना पलूस येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankalkhop village spontaneously closed for five days