खासदार विजयसिंह मोहिते-पाटलांपुढे पुन्हा आव्हान

प्रमोद बोडके : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री व माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय गृहदशा गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. पूर्वी एकहाती वर्चस्व असलेल्या माळशिरस तालुक्‍यातील संस्था ताब्यात ठेवण्यासाठी मोहिते-पाटलांना आता निवडणुकीतून राजकीय संघर्ष करावा लागत आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या निवडणुकीतून मोहिते-पाटलांपुढे पुन्हा एकदा राजकीय चॅलेंज समोर आले आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील उत्तम जानकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य के. के. पाटील, सासवड माळीशुगरचे रंगजनभाऊ गिरमे यांच्यासह सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन मोहिते-पाटलांच्या विरोधात मोट बांधली आहे. पूर्वी बिनविरोध होत असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत विरोधकांनी मोहिते-पाटलांचा घाम काढला. माजीमंत्री कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बाजार समितीमध्ये स्वतंत्र पॅनेल टाकल्याने तिरंगी लढत झाली. विरोधकांच्या मतविभागणीत राष्ट्रवादीच्या मोहिते-पाटलांचा विजय झाला. 

आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या कारखान्यासाठी 8 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील गटाची भूमिका काय असणार? बाजार समितीची चुरस कारखान्याच्या निवडणुकीतही दिसणार का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील विरोधकांनी वाढलेली संख्या पाहता या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: another challenge before vijaysinh mohite patil