नगरमध्ये आणखी एक कोरोनाबाधित आढळला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी 10 वाजेपर्यंत 1123 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1016 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल "निगेटिव्ह' आले. अजून 73 अहवालांची प्रतीक्षा आहे.

नगर : जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी एका 50 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. ही व्यक्ती नेवासे शहरातील असून, त्यास सर्दी, दम लागणे आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. शनिवारी (ता.11) या व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुना चाचणीसाठी पुण्याला पाठविला होता. त्याचा अहवाल आज (सोमवारी) प्राप्त झाला. त्यात ही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. 

दरम्यान, कालच (रविवारी) या व्यक्तीचा एक्‍स-रे काढला होता. त्यात त्याला न्यूमोनिया झाल्याचे, तसेच सारीसदृश आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज सकाळी या व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत तात्काळ ससून रुग्णालयास देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी सांगितले. 

कोरोनाबाधितांची संख्या 28 वर

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी 10 वाजेपर्यंत 1123 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1016 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल "निगेटिव्ह' आले. अजून 73 अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 28 वर गेली आहे. त्यात बीड येथील आष्टी तालुक्‍यातील एक आणि मूळची श्रीरामपूर तालुक्‍यातील, परंतु ससुन रुग्णालयात उपचार घेणाऱ्याचा समावेश होता. ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. 

449 जण "होम क्वारंटाईन' 

सध्या वैद्यकीय देखरेखीखाली 76 जणांना ठेवले असून, 449 जणांना "होम क्वारंटाईन' केले आहे. तसेच 679 जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. मुरंबीकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another one was found corona positive in Nagar