सोलापूर : जगतापांचे आणखी एक राजकीय वळण! 

अशोक मुरुमकर 
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

करमाळा तालुक्‍याचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव जगताप यांनी विधानसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय वळण घेतले आहे.

सोलापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा तालुक्‍याचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव जगताप यांनी विधानसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय वळण घेतले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचेच (युती झाली आणि बागल यांना शिवसेनेची उमेदवारी नाही मिळाली तर) काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या भूमिकेबाबत सुरु असलेल्या चर्चांना यामुळे पूर्ण विराम मिळाला आहे. माजी आमदार जगताप यांचा पाच वर्षातला हाही "वेगळा' निर्णय मानला जात आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी जगताप यांचे वर्चस्व होते. जयवंतराव जगताप हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विश्‍वासू सहकारी (कै) नामदेवराव जगताप यांचे चिरंजिव आहेत. ते शिवसेनेतून एकदा आमदार झाले होते. त्यांनी कॉंग्रेससह समाजवादी पक्षाकडूनही विधानसभा निवडणूक लढवली होती. 2014 च्या विधानसभेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली. तेव्हा कॉंग्रसेच्या चिन्हावर ते निवडणूकीच्या रिंगणात होते. पुढे करमाळा नगरपालिकेच्या निवडणूकीत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक बागल यांना एकत्र घेऊन ते रिंगणात उतरले. त्यात त्यांचे चिरंजिव वैभव जगताप यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

दरम्यान, पुन्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर एकत्रीत रिंगणात उतरले. यामध्ये शिवसेनेकडे पंचायत समिती आली. या निवडणूका झाल्यानंतर पुन्हा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. त्यात बागल, आमदार पाटील व माजी आमदार जगताप हे स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले. त्यात बागल यांनी विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा प्रथमच थेट मतदारांनी हक्क बजावलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. त्यात बागल यांच्या विरोधात जगताप व शिवसेनेचे पाटील यांनी एकत्र निवडणूक लढवली. या निवडणूकीपासून पुन्हा करमाळा तालुक्‍याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले. 

दरम्यान, निवडणूक कोणतीही असली तरी करमाळ्याच्या राजकारणात जगताप यांची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणूकीत त्यांचे चिरंचिव शंभुराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार जगताप यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केला नसला, तरी त्यांनी विधानसभेच्या तोंडावर जाहीर केलेला निर्णय जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

भाजप प्रवेशात आडकाठी? 
माजी आमदार जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशात आडकाठी येत असल्याची चर्चा आहे. त्यांनी यासाठी चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली होती. मात्र सध्या तरी त्यांचा भाजप प्रवेशाबाबत वेट ऍण्ड वॉच अशी स्थिती असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another political turn of the jaiwantrao jagtap!