रवींद्र लाखे यांना इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

  • इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर
  • इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर
  • विविध विभागातील पुरस्कारही जाहीर
  • कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ व येथील माधुरी काजवे यांचाही पुरस्कार प्राप्तव्यक्तींत समावेश. 

इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ व येथील ऍड. माधुरी काजवे यांचाही पुरस्कार प्राप्तव्यक्तींत समावेश आहे. 

पुरस्कार वितरण समारंभ 13 जुलै रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ही माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष अॅड. स्वानंद कुलकर्णी व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास शहा यांनी दिली. 

इंदिरा संत पुरस्कार काव्यसंग्रहामध्ये संपर्क क्षेत्राच्या बाहेर याला तर गद्य साहित्यिकमध्ये डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास या पुस्तकाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी 5 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांच्या सांज सावल्या कथासंग्रहाला, वि. मा. शेळके गुरूजी उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, रवी राजमाने (येळावी, सांगली) यांच्या वाळवाण कादंबरीला जाहीर झाला आहे. 

उत्कृष्ट अनुवादसाठीचा महादेव जाधव पुरस्कार मधुकर धर्मापूरीकर (नांदेड) यांच्या डिप्टी कलक्‍टरी अनुवाद तथा अनुभव या पुस्तकास, लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार इरफान शेख (चंद्रपूर) यांच्या माझ्यातला कवी मरत चाललाय व संजय पाटील पनवेल यांच्या हरवलेल्या कवितांची वही काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. 

विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार डॉ. वि. दा. वासमकर (सांगली) यांच्या मराठीतील कलावादी समीक्षा व डॉ. संदीप श्रोत्री (सातारा) यांच्या कासवानची भेट पुस्तकाला, शामराव भिडे ललित गद्य पुरस्कार प्रकाश राणे (मुंबई) यांच्या बारा मतीची माणसं पुस्तकाला जाहीर झाला आहे.

पार्वती तेलसिंगे बाल साहित्यकृती पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांच्या जॉयस्टिक या पुस्तकाला तर स्थानिक गौरव पुरस्कार माधुरी काजवे व उत्कृष्ट वाचक पुरस्कार नंदकुमार बंडगर यांना जाहीर झाला आहे. 

परीक्षक म्हणून डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. भीमराव पाटील, बलवंत जेवुलकर, प्रा. नंदकुमार मोरे, रजनी हिरळीकर, बाबूराव शिरसाट व निलम माणगावे यांनी काम पाहिले. 

निधीतून पुरस्कार 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1974 मध्ये इचलकरंजीत झाले होते. या संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट स्थापन केले आहे. ट्रस्टमार्फत दरवर्षी त्या वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात, तसचे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apate wachan mandir awards declared