सांगली : मालगावच्या जयहिंद सोसायटीवर प्रशासक नेमणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

दोन महिन्यातच या सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. 

मालगाव (सांगली) : सभासदांनी केलेल्या तक्रारीतील गैरव्यवहाराचा आरोप तपासणीत सिद्ध झाल्याने जयहिंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश तालुका सहकार उपनिबंधक आदिनाथ दगडे यांनी बुधवारी दिले. दरम्यान, दोन महिन्यातच या सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. 

सध्या गावांत सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीवरही संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईचा परिणाम होणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जयहिंद सोसायटीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सभासद सदानंद कबाडगे, राम चव्हाण आणि अन्य सभासदांनी सहकार विभागाकडे केली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे सोसायटीचे व्यवहार तपासून पाहण्याबाबत सभासदांनी पाठपुरावा केला होता. 

हेही वाचा - नानीबाई चिखलीतील दूरंगी सामना जिंकणार कोण? -

जिल्हा बॅंकेने कारभाराचे विशेष लेखापरीक्षण केले. त्यात आरोपांत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. संस्थेचे सचिव रंगराव चव्हाण यांच्यासह दोघांना संस्थेची रोख रक्कम वापरल्याप्रकरणी रक्कम व्याजासह संस्थेत परत भरण्याचा, भरली नाही तर फौजदारीचा इशाराही जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक कडू यांनी दिला होता. तपासणी अहवालास अनुसरुन तालुका उपनिबंधक आदिनाथ दगडे यांनी संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई केली आहे.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appoint a deputy on jaihind society for misconduct of working in sangli