कुंभार व्यावसायिकांवर "संक्रांत' 

Aquarius business is in danger ahmednagar news
Aquarius business is in danger ahmednagar news

कर्जत : दिवसेंदिवस कच्च्या मालाचे वाढणारे भाव, उत्पादनासाठी झालेला खर्च नि त्या तुलनेत मिळणारा तुटपुंजा नफा, याचा मेळ घालताना कुंभार व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात प्लॅस्टिक वस्तूंच्या आक्रमणामुळे त्यांच्या धंद्यावरच "संक्रांत' आली आहे. शाश्‍वत भाव किंवा आर्थिक अनुदान देण्याची या व्यावसायिकांची मागणी आहे. व्यवसायातून हातात काहीच पडत नसल्याने कुंभारांच्या भावी पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कुंभारांचे वारस बाहेर पडले असून, आता कुंभारवाडा ओस पडला आहे.

महिला वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणाच्या दिवशी महिला देवाला ओवासतात. बरोबरच अनेक धार्मिक विधी करतात. त्यासाठी ज्वारीची कणसे, गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याचा डहाळा यासह मातीचे खण व येळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे खण बनविण्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकाराची माती आणि घोड्याची लीद मिळविताना कुंभार मेटाकुटीला आले आहेत. हे सर्व साहित्य एकत्र बनवावे लागते. खण व येळी बनविण्यासाठी माती व लीद भिजत ठेवावी लागते. त्यात दोन दिवस जातात. नंतर ती चांगली मळण्यासाठी एक दिवस पुरत नाही. 

प्लॅस्टिक वस्तूचे आक्रमण

माती आणि लीदचे एकजूट मिश्रण झाल्यावर खण आणि येळीला आकार देण्यात एक दिवस जातो. त्यानंतर कच्चे खण, येळी भाजण्यासाठी भट्टी पेटवावी लागते. त्यासाठी कोळसा, लाकूड यांसह लाकडी भुसा वापरला जातो. साधारण 500 खण व येळी बनविण्यासाठी कमीत कमी पाच ते आठ दिवस लागतात. तयार झालेली खण, येळीमध्ये होणारी तूट-फूट, भट्टीचे वाढलेले तापमान याचाही फटका बसतो. कुंभारांना नुकसान सहन करावे लागते. त्यात प्लॅस्टिकच्या वस्तू तुलनेत स्वस्त मिळतात. परिणामी, कुंभार समाज या व्यवसायापासून दूर जात आहे.

शासनाने अनुदान द्यावे

संक्रांतीसाठी आवश्‍यक पाच खण, येळी बनविण्यासाठी सरासरी 20 रुपये खर्च येतो. ती केवळ 25 रुपयांपर्यंत विकली जातात. एका नगामागे सरासरी एक रुपया, तर संचामागे पाच ते सहा रुपये नफा निघतो. त्यातून ने-आण करताना तूटफूट होते. त्यामुळे मोठे नुकसान होते. कुटुंबातील राबणाऱ्या हातांचे मोलसुद्धा निघत नाही. या व्यवसायाला पुन्हा एकदा भरभराट येण्यासाठी शासनाने अनुदान देणे गरजेचे आहे. 
- भाऊसाहेब बेलस्कर, कुंभार व्यावसायिक, पाटेगाव, ता. कर्जत 

माहितीसंकलनाचे काम सुरू 

कुंभार व्यावसायिकांसह इतर निगडित घटक व या व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी स्वतः लक्ष घालणार आहे. त्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, याबाबत अधिकचे प्रयत्न काय करता येतील, यासाठी तज्ज्ञांचे अभिप्राय मागितले आहेत. 
- आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड मतदारसंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com