विभुतवाडीत शस्त्राच्या धाकाने लूटमार; पिता-पुत्रांसह तिघांवर हल्ला

सदाशिव पुकळे
Wednesday, 16 December 2020

विभुतवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील स्वाती किराणा स्टोअर्समध्ये मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान जबरी चोरी झाली.

झरे ः विभुतवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील स्वाती किराणा स्टोअर्समध्ये मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान जबरी चोरी झाली. त्यामध्ये रोख रक्कम 45 हजार रुपये व 5 तोळे सोने, गोडे तेलाचे 4 डबे, असा अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरटे दोन ठिकाणी चोरी करण्यात यशस्वी झाले, तर एका ठिकाणी त्यांचा प्रयत्न विफल ठरला. याशिवाय विठ्ठल पावणे यांच्या घरात कुकरीच्या सहाय्याने धाक दाखवत पिता-पुत्रांसह तिघांवर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कुरुंदवाडी येथील येसाबाई खताळ यांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवले, तर विजय वगरे यांच्या घराचा गज नेला. जोतिराम वगरे यांच्या दुकानाचे शटर उघडण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला.

दरम्यान, विभुतवाडी येथील विठ्ठल पावणे यांच्या घरांमध्ये चोरी करताना आवाज होताच, त्यांचे वडील दादा पावणे हे जागे झाले. त्यांनी तिघा चोरट्यांना पाहिले. त्यांनी मुलाला व नातवाला हाका मारण्यास सुरवात केली. वडिलांचा आवाज ऐकून मुलगा विठ्ठल, सुमित, सुजित जागे झाले व खोलीकडे धाव घेतली. त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. यावेळी त्यांनी चोरट्यांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने विठ्ठल यांच्या पोट व पाठीवरती वार केले. मुलगा सुमित (वय 22) याच्या हातावर, तर दुसरा मुलगा सुजित (वय 26) याच्याही पाठ व कानावर वार केले.

यामध्येही तिघेही जखमी झाल्याने आरडाओरडा गोंधळ झाल्यानंतर चोरट्याने पळ काढला. चोरी होत असताना घराच्या बाहेर पल्सर गाडी उभी होती; तर तेथून काही अंतरावर बसस्थानक शेजारी चार चाकी गाडी उभा होती, असे नागरिकांनी सांगितले. 

जखमींना आटपाडी येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले, परंतु तेथे कोरोनाचे पेशंट असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना म्हसवड येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक अंकुश इंगळे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. 

गस्तीपथके वाढवायला हवीत
चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी गेलो व जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. चोरीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांनी गस्तीपथके वाढवायला हवीत. 
- चंद्रकांत पावणे, सरपंच 

चोरीचा छडा लवकरच लावू.
तीन ठिकाणी घरफोडी झालेली असून, विठ्ठल पावणे व त्यांच्या दोन्ही मुलांना धारदार शस्त्राने वार केले आहेत. ते उपचार घेत आहेत. या चोरीचा छडा लवकरच लावू. 
- बजरंग कांबळे, पोलिस निरीक्षक 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Armed robbery at Vibhutwadi; Attack on three including father and son