कोरोनाविरोधात फाईटसाठी 10 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची आर्मी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

जिल्ह्यातील 45 लाख लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणेतील तब्बल दहा हजार अधिकारी- कर्मचारी महिनाभरापासून राबत आहेत. त्यांत महसूल, आरोग्य, पोलिस, आयआरपीएफ, एसआरपीएफ, गृहरक्षक दलाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

नगर : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस, महसूल, आरोग्य यंत्रणा अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. लॉक डाऊनच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल 10 हजार अधिकारी- कर्मचारी, पोलिस, डॉक्‍टर सेवा बजावत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, विनाकारण बाहेर भटकणाऱ्या नागरिकांनी भान बाळगावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

कोरोना संकटाची चाहूल मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लागली होती. त्यानुसार सरकारनेही तातडीने उपाययोजनांची तयारी युद्धपातळीवर केली. विदेशी व त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाद्वारे जनजागृती सुरू आहे. कोरोनासंशयितांची नियमित माहिती घेऊन, त्यांच्या स्रावांचे नमुने "एनआयव्ही'कडे पाठविले जात आहेत.

अहवाल "पॉझिटिव्ह' आलेल्या लोकांना "आयसोलेशन'मध्ये, तर संपर्कातील व्यक्तींना "होम क्वारंटाईन' केले जात आहे. जिल्ह्यात 12 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. कालपर्यंत (रविवारी) जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोचली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी मैदानात उतरले आहेत.

जिल्ह्यातील 45 लाख लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणेतील तब्बल दहा हजार अधिकारी- कर्मचारी महिनाभरापासून राबत आहेत. त्यांत महसूल, आरोग्य, पोलिस, आयआरपीएफ, एसआरपीएफ, गृहरक्षक दलाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणा व मनपा आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाविरोधात जिवाचे रान करीत आहेत. 

विभागनिहाय कर्मचारी 
महसूल - 1000, जिल्हा ग्रामीण आरोग्य- 4729, जिल्हा रुग्णालय - 400 
मनपा आरोग्य- 900, पोलिस दल- 3200, आयआरपी- 6 तुकड्या, एसआरपी- 3 तुकड्या 
गृहरक्षक दल - 600, स्वच्छता सेवक- 2500 

"लॉक डाउन'च्या काळात प्रत्येक गरजूपर्यंत आवश्‍यक ती मदत प्रशासन पोचवत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. "सोशल डिस्टन्स' पाळा. शक्‍यतो घराबाहेर पडूच नका. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army of 10,000 officers-staff for fight against Corona