तर घंटागाडीप्रमाणे भाजीपाला घरपोच करू....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे. त्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला व्यापारी व पदाधिकारी यांची बैठक झाली.

इस्लामपूर - गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना घंटागाडीप्रमाणे भाजीपाला पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असा निर्णय आज इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे. त्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला व्यापारी व पदाधिकारी यांची बैठक झाली. सभापती अॅड. विश्वासराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, संचालक शामसुंदर पाटील, बाळासाहेब इंगळे, संदीप पाटील, दिलीप देसाई, शंकरराव खांबे, सचीव विजयकुमार जाधव, सहकार उपनिबंधक रंजना बारहाते, भाजीपाला व्यापारी लालासाहेब गुरव, सोमनाथ शिंदे, लालासो माने, बंडा घारे व इतर व्यापारी उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत शहरी भागात भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणेसाठी घंटागाडी प्रमाणे भाजीपाला गाड्यांची व्यवस्था करणे बाबत चर्चा झाली. त्यासाठी भाजीपाला आडते, बाजारातील व्यापारी व शेतकरी यांचा समन्वय साधून सध्या मागणी प्रमाणे पुरवठा कसा करायचा यावर विचार झाला. ही योजना प्रायोगिक तत्वावर सद्या काही गावांमध्ये पुढील आठवड्या पासून राबविण्यात येणार असल्याचे सभापती विश्वासराव पाटील यांनी सांगितले. त्यासाठी शासकीय अधिकारी व बाजार समिती पदाधिकारी यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल असे तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrangements will be made to provide vegetables to the citizens in islampur