
बोगस कंपनीद्वारे कर्ज मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्यास मिरज शहर पोलिसांनी केवळ चोवीस तासांत अटक केली.
मिरज (जि. सांगली) : बोगस कंपनीद्वारे कर्ज मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्यास मिरज शहर पोलिसांनी केवळ चोवीस तासांत अटक केली. रमेश नाना निकम (वय 32, रा. मार्डी ता. माण जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून फसवणुकीची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज शहर पोलिस ठाण्यातील संजय येवले या गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे हा संशयित भामटा रमेश निकम हा पोलिसांच्या हाती लागला आणि अनेकांची फसवणूक टळली.
मिरज शहरातील बोलवाड रस्त्यावर सचिन नायकु बरगाले यांचे खताचे दुकान आहे. त्याचा फोन नंबर घेऊन संशयित भामटा रमेश निकम यांने त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी व्यावसायिक स्वरुपात मदत करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी आपण लेंडिग मार्क या कंपनीची स्थापना केल्याचीही बतावणी केली. बरगाले यांच्याशी सातत्याने संपर्क साधून संशयित ठकसेन रमेश निकम याने चौदा लाख रुपयांचे कर्ज व्यवसायासाठी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कमिशन द्यावे लागेल, असेही बरगाले यांना सांगितले. आणि ही रक्कम आपल्या मध्यस्थीनेच द्यावी लागेल असे सांगून त्यासाठी निकम याने स्वतःचा बॅंकेतील खाते नंबरही दिला. आणि याच खात्यावर 1 लाख 8 हजार 880 रुपयांची रक्कम स्वीकारली.
हा सगळा व्यवहार करताना संशयित ठकसेन निकम याने जो मोबाईल नंबर वापरला होता त्याच्याच आधारे पोलिसांनी या ठकसेनास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 1 लाख 8 हजार 880 रुपयांची रक्कम हस्तगत केली. ही कारवाई करताना येवले यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी मार्गदर्शन केले.
संपादन : युवराज यादव