
वाखरी : दाटून आलेले ढग...पंढरी समीप आल्याचा आनंद...टाळ-मृदंगातील गगनभेदी गजर...‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष आणि चिखलात देहभान विसरून नाचणारे वारकरी, अशा भक्तिरसात ओथंबलेल्या वातावरणात वाखरीजवळ उभ्या आणि गोल रिंगणात अश्वांनी दौड मारत लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वाखरीत सकल संतांची मांदियाळी मुक्कामी आहे. भंडीशेगाव येथील तळावर पहाटे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी महापूजा केली. त्यानंतर कांदेनवमी असल्याने तळांवर कांदेभज्यांची न्याहरी झाली. दुपारचे जेवण करून सोहळा एक वाजता पालखी सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. निघाल्यापासूनच उन्हाची तिरीप होती. भंडीशेगाव ओलांडल्यानंतर ढगांनी आभाळ भरून गेल्याने उकाडा वाढला. वारकरी घामाघूम झाले होते मात्र, हरिनामाने त्यांच्या पायाला बळ मिळत होते. तीनच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा वाखरीजवळ उभ्या रिंगणासाठी थांबला. मधोमध पालखी रथ थांबला. लगेचच दिंड्यांमधून रिंगण लावण्यात आले.