जयंतरावांची ऑफर अन्‌ वैभवरावांचं मौन; कारभारी मात्र अस्वस्थ

तानाजी टकले
Friday, 8 January 2021

राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. विलासरावजी शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची ऑफर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याच्या चर्चा आहेत.

आष्टा (जि. सांगली) ः राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. विलासरावजी शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची ऑफर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याच्या चर्चा आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी ही जयंतनीती असली तरी वैभवरावांचे याबाबत मौनच आहे. जयंतरावांची ऑफर अन्‌ वैभवरावांचं मौन पालिकेतील सत्ताधारी कारभाऱ्यांना अस्वस्थ करीत आहे. शहरभर पालिका निवडणुकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार की त्यांच्यात बदला आणि बदल्यासाठीचा संघर्ष पेटणार याबाबत तर्क सुरू आहेत.

पालिकेत तब्बल 25 वर्षांपासून सत्तेची सूत्रे स्व. विलासरावांच्याकडे होती. ती पक्षविरहित आघाडीच्या माध्यमातून होती. राजकीय संघर्ष बाजूला ठेवत शहराच्या विकासासाठी स्व. विलासराव व मंत्री जयंतराव यांनी हातात हात घेतले. त्यांच्यात विधानसभा जयंतरावांकडे तर आष्टा पालिका विलासरावांच्याकडे असा अलिखित करार ठरला. त्यानुसार मोजक्‍याच जागा स्वीकारत मंत्री गट शिंदे गटासोबत पालिकेच्या सत्तेत आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीने दोन्ही गटांत पुन्हा राजकीय संघर्ष पेटला. जिल्हा परिषद निवडणुकीत स्व. विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव यांचा राष्ट्रवादीत असून देखील पराभव झाला. मंत्री पाटील यांनीच हा "करेक्‍ट कार्यक्रम' केल्याच्या भावना शिंदे समर्थकांतून व्यक्त झाल्या. स्व. विलासराव यांच्या देखील जिव्हारी हा पराभव लागला.

यातूनच वैभव यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरासाठी अप्पर तहसील कार्यालय मंजूर केले. दरम्यान, विलासरावांचे निधन झाले. शिंदे गटाचे नेतृत्व यातून गटांतर्गत कुजबूज झाली. मात्र तालुका अन्‌ शहराचे नेतृत्व ठरले. राजकीय संघर्ष बाजूला ठेवत विलासरावांच्या जयंती कार्यक्रमात जयंत पाटील यांनी वैभव व विशाल यांना साथ देण्याची ग्वाही दिली. वैभव यांनी या बाबतही तटस्थ भूमिका घेतली. वर्षभरापासून वैभव पालिकेतील शिंदे गटाचे नेतृत्व करीत आहेत. कोरोनाकाळात घराघरापर्यंत जात नागरिकांना आरोग्य सुविधा दिल्या. त्यांचे मनोबल वाढवले.

रस्ते, गटारी, नळ कनेक्‍शन या बाबतच्या अनेक विकासकामांचा प्रारंभ केला. पालिकेत अनेक उपक्रम राबवून जनतेचा विश्‍वास संपादन केला. तरुणांना आकर्षित केले. पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असतानाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील शहरात जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामुळे पालिका निवडणूक मंत्री गट विरुद्ध शिंदे गट अशीच होणार की काय असे चित्र निर्माण झाले असतानाच जयंत पाटील यांनी पुन्हा वैभव यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा रंगत आहे. वैभव यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसल्याने सत्तेतील कारभाऱ्यांचा गुंता वाढत आहे. पालिका निवडणूक मंत्री गट, शिंदे गट की पुन्हाएकत्रित या विवंचनेत कारभारी आहेत. 

स्थानिक नेतृत्वाशी सलगी वाढवल्याचे चित्र 
अनेक मातब्बरांच्या दांड्या गुल होण्याचे संकेत असल्याने त्यांनी दोन्ही गटाच्या स्थानिक नेतृत्वाशी सलगी वाढवल्याचे चित्र आहे. पालिका निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच पालिकेत अद्याप शांतताच आहे. कारभाऱ्यांच्यात एकमत दिसत नाही. तूर्तास वैभव शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashta municipalty Jayantarao's offer and Vaibhavrao's silence