
जनता दरबार विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटने यांनी आष्टा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजत आहे.
आष्टा (जि. सांगली) ः जनता दरबार विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटने यांनी आष्टा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजत आहे. पालक नेते स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने सत्ताधारी जयंत पाटील आणि विलासराव शिंदे गटात स्वतंत्र चाली सुरू आहेत. दोन्ही गटाकडून जनतेशी संपर्क सुरु आहे. चाली-प्रतिचालीच्या प्रवाहात कारभारी मात्र अस्वस्थ आहेत. तुर्तास दोन्ही गटाच्या भूमिकेवर पालिकेच्या सत्तेचे समीकरण ठरणार आहे.
आष्टा पालिकेत स्वर्गीय विलासराव शिंदे यांनी आपले नेहमीच स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. पालिकेची सत्ता कधीच पक्षीय झेंड्याखाली येऊ दिली नाही. मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तर स्वर्गीय शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष राहून देखील त्यांनी पालिका निवडणूक राष्ट्रवादी पक्षातर्फे लढवली नाही. पाच वर्षात विलासराव-जयंतराव एकत्र राहिले. सत्ता एकत्रीत ठेवली; पण शिंदे यांचा मुलगा वैभव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कडूनच नव्हे तर मंत्री पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम पराभव झाल्याच्या भावनेने राष्ट्रवादीची साथ सोडली. पण पालिका राजकारणापासून वैभवही अलिप्त राहिले.
दरम्यान विलासरावांचे निधन झाले. पालिकेची सूत्रे कोणाकडे हा प्रश्न उभा ठाकला. जयंतरावांनी वैभव यांना राष्ट्रवादीची पुन्हाऑफर दिली. वातावरण निवळले. वैभव यांनी पालिकेत नेतृत्व केले. गट बांधणी मोर्चेबांधणी सुरू झाली, पण आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नसल्याने दोन महिन्यापासून जयंत पाटील यांनी शहरासाठी आपली जयंत रणनीती सुरू केली आहे. जयंतरावांनी शहरात कधी नव्हे तो थेट जनता दरबार सुरू केला. स्वतंत्र समितीमार्फत 25 वर्षात पहिल्यांदाच जनतेचे प्रश्न जाणून घेतले. स्वतंत्र समिती मार्फत निरसन केले. पाच कोटी रस्ते निधी दिला. यातून या गटाला जनतेचा प्रतिसाद मिळाला. एवढेच नव्हे तर विलासरावांनी बौद्ध समाजात कधीही जयंतराव यांचा शिरकाव होऊ दिला नव्हता.
या समाजाचा तीनशे वर्षाचा प्रश्न जयंतरावांनी निकालात काढला. तक्का इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला स्व. शिंदे गटाचे नेते असणाऱ्या वैभव शिंदे यांना डावलून त्यांनी आपली नीती स्पष्ट केली. शिंदे गटात अस्वस्थता पसरली. लागलीच शिंदे गटाने सावध भूमिका घेत पालिका विकासकामांचा कृती विकासआराखडा सादर करीत थेट जनतेत संपर्क साधला. बांधिलकी आष्टेकरांशी अशी अनोखी दिनदर्शिका घरोघरी वाटत जनसंपर्क अभियान हाती घेतले. महिला मेळाव्यातून तर वैभव यांच्या नेतृत्वाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून वैभव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. शिंदे गटाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. बौद्ध समाजाच्या कार्यक्रमाला वैभव यांना निमंत्रण दिले नसल्याने शिंदे गटाचा स्वाभिमान पुन्हा दुखावला.
घरवापसीची चर्चा
दोन्ही गटाकडून स्वतंत्र चाली सुरू असून पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असले तरी वैभव यांच्या राष्ट्रवादी घरवापसीची चर्चा जोरदार सुरू आहे. आता दोन्ही गटाकडून पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गट बांधणी, मोर्चेबांधणी, उमेदवार चाचपणी सुरू आहे. दोन्ही गटाच्या भूमिकेवरच पालिका निवडणुकीच्या सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. सत्तेचे कारभारी दोन्ही गटाच्या मनोमिलनाची आशा बाळगून आहेत.
संपादन : युवराज यादव