आष्ट्यात नगरसेवक दीपक मेथेंचा राजीनामा 

तानाजी टकले 
Tuesday, 14 July 2020

आष्टा पालिकेत स्वीकृतची दोन पदे आहेत. एक मंत्री जयंत पाटील गटाकडे तर दुसरे माजी आमदार विलासराव शिंदे गटाकडे.

आष्टा (सांगली) ः पालिकेचे स्वीकृत नगरसेवक दीपक मेथे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. मंत्री जयंत पाटील गटात इच्छुकांची मांदियाळी आहे. शह-काटशह, डाव-प्रतिडाव साधत नेत्यांच्या गाठीभेटी सुरु आहेत. युवा पलटण स्पर्धेत उतरल्याने कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे. इच्छुकांनी आपल्यालाच संधी मिळावी यासाठी देव पाण्यात घातलेत. 

आष्टा पालिकेत स्वीकृतची दोन पदे आहेत. एक मंत्री जयंत पाटील गटाकडे तर दुसरे माजी आमदार विलासराव शिंदे गटाकडे. शिंदे गटाने माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांची पाच वर्षासाठी निवड केली आहे. मंत्री गटात मात्र प्रत्येकाला संधी या धोरणानुसार प्रत्येक वर्षी एकाला संधी दिली जाते. जातीय समीकरणाचाही विचार केला जातो. मंत्री गटाचे दीपक मेथे यांनी मिळालेल्या संधीतून लोकोपयोगी कामे करीत संघटन कौशल्याचा खुबीने वापर केला. मंत्री श्री. पाटील यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांची मुदत संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. नव्याने या ठिकाणी 20 जुलैला निवडी होणार आहेत. पाटील गटात एका जागेसाठी इच्छुकांची मांदियाळी आहे. 

विकास बोरकर, धैर्यशील थोरात, ऍड्‌. पंडीत बसुगडे, नवरत्न ग्रुपचे मारुती माने, शशिकांत भानुसे, सुनिल जाधव, सयाजी गावडे, रिजवान नायकवडी, विनायक भोई, उदय कुशिरे, संग्राम जाधव, गुंडा मस्के, ऍड्‌. अभिजीत वग्याणी, शरद आटुगडे यांनी फिल्डींग लावली आहे. इच्छुक अनेक असल्याने चार-चार महिन्यांचा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. स्थानिक नेत्यांनी समर्थकांना संधी मिळावी, अशी मोर्चेबांधणी सुरु केलीय. तालुका पातळीवरील नेत्यांबरोबरच इच्छुकांनी मंत्री पाटील यांच्या भेटी घेऊन संधीची मागणी केलीय. मंत्री पाटील कोणाची वर्णी लावणार याकडे लक्ष आहे. 

स्थानिकांत मतभेद 
तशा या निवडी स्थानिक नेत्यांनी करावयाच्या हा अलिखीत नियम. मात्र येथील नेत्यांत प्रचंड मतभेद असल्याने शहरात गटबांधणी दूरच; या नेत्यांनी आपल्या निवडीचे अधिकारही गमावलेत. त्यामुळे निवडीसाठी इच्छुकांना तालुका पातळीवरील नेत्यांचे पाय धरावे लागत आहेत. परिणामी स्थानिक नेत्यांच्या कर्तृत्वावर इच्छुकांत प्रचंड नाराजी आहे. 

संपादन ः शैलेश पेटकर 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashtya corporator Deepak Methe resigns