आष्ट्यात उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक घेताहेत गाठीभेटी 

तानाजी टकले
Tuesday, 4 August 2020

आष्टा नगरपालिकेच्या राजकीय पटलावर स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या राजकीय पटलावर स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सहा-सहा महिन्याची ठरलेला कालावधी नुकताच संपल्याने नगरसेवक अर्जुन माने यांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. 

पालिकेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी आमदार स्व. विलासराव शिंदे गटाची सत्ता आहे. सत्ता एकत्रित असली तरी जयंत पाटील गटाचे कारभारी पदांच्या पालखीचे भोईच असल्याचे नागरिकांचे बोल आहेत. एकत्रित सत्तेत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे हक्कदार शिंदे गट होता. मात्र मागील निवडणूकीपासून नगराध्यक्ष पद कायम व उपनगराध्यक्ष पद तीन वर्षे शिंदे गटाला व दोन वर्षे मंत्री पाटील गटाला असे निश्‍चित केले आहे. 

दुसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी मंत्री गटाला संधी असते. चालू वर्षात मंत्री गटात मनिषा जाधव, अर्जुन माने यांच्यात खल झाला. श्रेष्ठींनी दोघांनाही सहा-सहा महिन्याची संधी देण्याचे सुतोवाच केले. फेब्रुवारीमध्ये मनिषा जाधव यांना संधी देण्यात आली. उर्वरीत सहा महिने अर्जुन माने यांना देण्याचे ठरले. सौ. जाधव यांनी पदाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली. जनसंपर्क राबवला. शहरातील विकासकामात योगदान दिले. त्यांचे पती प्रभाकर जाधव यांनी जनतेशी नाळ जोडीत नागरिकांच्या प्रश्‍नांचे निराकरण केले. 

सौ. जाधव यांचा सहा महिन्याचा कार्यकाल जुलै अखेर संपल्याचा पालिका वर्तुळात चर्चा आहेत. इच्छुकांचे राजीनाम्याकडे लक्ष आहे. पुढील सहा महिन्यासाठीची दावेदारी असणारे अर्जुन माने यांनी श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, दिलीप पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्या बरोबरच अपक्ष तेजश्री बोंडे, जगन्नाथ बसुगडे यांनीही संधी मिळण्याची मागणी केली आहे. तुर्तास पालिकेच्या राजकीय पटलावर उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली वेगवान झाल्या असून मंत्री गटात जुळवाजुळव सुरु आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashtya is seeking aspirants for the post of Deputy Mayor