Vidhan Sabha 2019 : 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे आता युती सरकारलाच विचारा - डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

गेल्या विधानसभा निवडणुकीत जाहिरातींचा मारा करून राज्यात भाजप व शिवसेना सत्तेवर आली. पाच वर्षात सर्वच पातळींवर या सरकारला आलेले अपयश पाहता यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या भुलथापांना आता महाराष्ट्रातील जनता भुलणार नाही. 

- डाॅ. अमोल कोल्हे

गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज येथे केले.

कागल मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार हसन मुश्रीफ व चंदगड मतदारसंघाचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही सभा झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जाहिरातींचा मारा करून राज्यात भाजप व शिवसेना सत्तेवर आली. पाच वर्षात सर्वच पातळींवर या सरकारला आलेले अपयश पाहता यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या भुलथापांना आता महाराष्ट्रातील जनता भुलणार नाही. 

- डाॅ. अमोल कोल्हे

डॉ. कोल्हे म्हणाले, ""ही निवडणूक केवळ दोन पक्षांची आणि उमेदवारांची नाही तर दोन विचारांची आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. गेल्या निवडणुकीत युतीच्या घोषणांना भुलून महाराष्ट्राने सत्ता दिली. सह्याद्रीच्या काळ्या पत्थरातही कमळ फुलले. परंतु पाच वर्षात याच कमळाने पुरता चिखल करून सोडला. 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही संख्या तेथेच थांबत नाही. त्यांच्याबरोबर सोळा हजार कुटूंबे उद्‌धवस्त झालीच शिवाय हजारो लेकरं अनाथ झाली. शेतकरी कर्जमाफी, तरूणांना रोजगार, महिलांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अवघ्या पाच वर्षात राज्यावर 2 लाख 15 हजार कोटींचे कर्ज करून ठेवणाऱ्या युती सरकारला राज्यात पायाभूत सुविधाही पुरवता आल्या नाहीत. यामुळे आता युतीने महाराष्ट्राची दिशाभूल करणे थांबवावे.""

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ""जनतेच्या प्रत्येक संकटाला धावून आलो. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले. शोषित, वंचित पिडीतांना आपलंसं करून त्यांच्या समस्या सोडविल्या. भविष्यात कागल मतदारसघ देशात अव्वल बनवण्याचा प्रयत्न राहील. शरद पवारांनी ज्यांना भरभरून दिले ते सोडून गेले. परंतु मी निष्ठा सोडली नाही. सत्ता संपत्तीपुढे झुकलो नाही. या निवडणुकीत मला ताकद देणाऱ्यांचे ऋण मी हयातभर विसरणार नाही. राजे राजवाडे गेले. परंतु मावळ्यांच्या साथीने पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करू.""

आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, ""राज्यातील युती सरकार सर्वच कामात अपयशी ठरले आहे. समाजातील सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, पण गरजू शेतकरीच वंचित राहिले. या शासनाला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कागलमधून मुश्रीफ व चंदगडमधून राजेश पाटील यांना विजयी करावे.""

प्रा. किसनराव कुराडे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, राजेंद्र गड्ड्यान्नावर, चंदगडचे उमेदवार राजेश पाटील यांचीही भाषणे झाली. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. सभेला माजी आमदार श्रीपतराव शिंदे उपस्थित होते.

मुश्रीफांनी बांधली 500 मंदिरे 
डॉ. कोल्हे म्हणाले, ""निवडणूक राज्याची असताना भाजप - शिवसेना नेते मात्र 370 कलम रद्द आणि राम मंदिर उभारणीचे मुद्दे प्रचारात आणत आहेत. या मुद्यांनी राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही की तरूणांना रोजगार. भाजपला कित्येक वर्षे राम मंदिर उभारणी जमले नाही. पण मुश्रीफांनी स्वबळावर कागलात राम मंदिर उभारले. या पठ्ठ्याने मतदासंघातील गावांगावात पाचशे मंदिरे उभारली. पब्लिक ट्रस्टचा कायदा आणून पंचतारांकीत हॉस्पीटलमध्ये गरीब रूग्णांवर मोफत उपचार सुरू केले.""
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ask the Alliance Government What they did in Maharashtra Dr Amol Kolhe comment