
सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत इच्छुकांची अडचण झाली आहे. त्यांनी बदलाची मागणी रेटण्यासाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संपर्क साधला आहे.
सांगली ः जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. महापौर निवडीतील घडामोडीनंतर या ठिकाणी बदलाला अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे इच्छुकांची अडचण झाली आहे. त्यांनी बदलाची मागणी रेटण्यासाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संपर्क साधला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक बैठक झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी या मंडळींनी केली आहे. या स्थितीत प्रदेशाध्यक्ष वेळ देणार का, याकडे लक्ष असेल.
चंद्रकांत पाटील यांनी 25 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेतील बदलाबाबत चर्चा करू, असे सांगितले होते. महापौर निवडीत 23 फेब्रुवारीला गडबड झाली. भाजपचा सत्ता असताना राष्ट्रवादीने दणका दिला. स्पष्ट बहुमतातील सत्ता हरवली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काठावरच्या आणि कुबड्यांच्या सत्तेबाबत भाजप डाव खेळणार का, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.
जिल्हा परिषदेत बदल करण्याची तांत्रिकदृष्ट्या अजिबात गरज नाही, मात्र सव्वा वर्षाने नव्या लोकांना संधी द्यावी, असे ठरले होते. त्यानुसार खांदेपालट झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी खासदार संजय पाटील गट, आटपाडीचा देशमुख समर्थक गट आणि विशेषतः मिरजेचा आमदार सुरेश खाडे समर्थक गट ताकदीने करत आहे. हे तीनही गट भाजपचे महत्त्वाचे आहेत. त्यातील इच्छुकांना डावलूनही चालणारे नाही. त्यामुळे चंद्रकांतदादांनी वेळ काढावा आणि चर्चा करावी, अशी या इच्छुकांची मागणी आहे.
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी या सदस्यांनी संपर्क साधला आहे. त्यांनी महापौर पदाचा विषय ताजा आहे. वातावरण तापलेले आहे. थोडे थंड होऊ द्या, मग चर्चा होऊ शकेल, असा संदेश दिला आहे. त्यामुळे इच्छुकांनी काही दिवस प्रतीक्षा करण्याची तयारी ठेवली आहे. परंतु, बदलाला नकार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा संदेशही त्यांनी दिला आहे.
संपादन : युवराज यादव