
आटपाडी तालुका कृषी विभागाने चालू आर्थिक वर्षामध्ये रोजगार हमी योजनेतून (रोहयो) विक्रमी 545 शेतकऱ्यांना 434 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
आटपाडी (जि. सांगली) ः आटपाडी तालुका कृषी विभागाने चालू आर्थिक वर्षामध्ये रोजगार हमी योजनेतून (रोहयो) विक्रमी 545 शेतकऱ्यांना 434 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गेल्या पंधरा वर्षांतील विक्रमी मंजुरी आणि लागवड ठरली आहे. आटपाडी तालुका डाळिंब उत्पादन घेण्यात राज्यात आघाडीवर आहे. तालुक्यातून युरोपियन राष्ट्रांना डाळिंबाची निर्यात वाढू लागली आहे. टेंभूचे पाणी आल्यामुळे फळबागा लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे.
आटपाडी तालुक्यात सध्या 15 हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. दरवर्षी नवीन लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी आटपाडी तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून दाखल झालेल्या डाळीब लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी देणे बंद केले होते. गेल्यावर्षी जेमतेम बारा हेक्टर क्षेत्राला मंजुरी दिली होती. तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील गेल्या वर्षी रुजू झाले. यापूर्वीही त्यांनी तालुका कृषी अधिकारी म्हणून आटपाडीत काम केले होते. 2020 ते 21 मध्ये तालुक्यातून जवळपास 550 शेतकऱ्यांनी नवीन डाळिंब लागवडीचे प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केले होते.
यातील विक्रमी 545 शेतकऱ्यांच्या 437. 50 हेक्टर क्षेत्राला रोजगार हमी योजनेतून डाळिंब लागवड करण्यास मंजुरी दिली आहे. ही मंजुरी गेल्या पंधरा वर्षातील उच्चांकी ठरली आहे. यातील 254 शेतकऱ्यांनी 191 हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत लागवड पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची पूर्वतयारी सुरू आहे. याशिवाय कृषी विभागाने आंबा, चिकू, नारळ या फळबागा लागवडीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यासाठी हेक्टरी दोन लाख 17 हजार रुपये तीन वर्षात मिळतात.
पांडुरंग फुंडकर योजनेतून डाळिंब लागवडीची ऑनलाइन नोंदणी चालू आहे. मात्र त्याला वर्षभरापासून मंजुरी शासनाकडून मिळाली नसल्यामुळे रोजगार हमी योजनेतून लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना रोहयोचा लाभ मिळत नाही. पांडुरंग फुंडकर योजनेतूनही मंजुरी थांबवल्यामुळे ते शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ती अट रद्द करून त्यांनाही रोहयोतून मंजुरी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
दृष्टिक्षेप
- 434 हेक्टरवर डाळिंब लागवडीसाठी मंजुरी
- युरोपियन राष्ट्रांना डाळिंबाची निर्यात वाढली
- टेंभूचे पाणी आल्याने बागा फुलल्या
- 191 हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत लागवड पूर्ण
- दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राची अट रद्द करावी
- पांडुरंग फुंडकर योजनेतूनही मंजुरी थांबली
डाळिंब लागवडीत अंतराची अट रद्द.
रोहयोतून डाळिंब लागवडीसाठी शासनाने दोन झाडातील ओळी आणि अंतराची जाचक अट घातली होती. ही जाचक अट शासनाने गेल्या वर्षीपासून काढून टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीने जमिनीचा स्तर पाहून लागवडीचे अंतर ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे. यामुळे मोठ्यासंख्येने लागवडीसाठी प्रस्ताव दाखल झाले आणि अधिकाऱ्यांनाही मंजुरी देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे "रोहयो'तून डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढत जाणार आहे.
437 क्षेत्राच्या रोहयोतून नवीन डाळिंब लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी
चालू आर्थिक वर्षामध्ये तालुक्यातील 545 शेतकऱ्यांच्या 437 क्षेत्राच्या रोहयोतून नवीन डाळिंब लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यातील 254 शेतकऱ्यांनी 191 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. उर्वरित ही लागवड लवकरच पूर्ण होईल.
- पोपट पाटील, आटपाडी तालुका कृषी अधिकारी
संपादन : युवराज यादव