आटपाडी : राजेंद्रअण्णांच्या पराभवास खासदार अन्‌ भाजप जबाबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुखवाडी विकास सेवा सोसायटीच्या निवडणूक प्रचार बैठकीत

आटपाडी : राजेंद्रअण्णांच्या पराभवास खासदार अन्‌ भाजप जबाबदार

आटपाडी : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी धक्कादायक पराभव केला होता. त्या पराभवाचे कारण-कारस्थान आणि गुपित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उलगडत जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांच्यापासून खासदार आणि खुद्द भाजपलाच जबाबदार ठरवत निशाणा साधला.

आटपाडी तालुक्यात विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. देशमुखवाडी विकास सेवा सोसायटीच्या निवडणूक प्रचार बैठकीत अमरसिंह देशमुख यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्रअण्णा देशमुख यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर पहिल्यांदाच जाहीर आणि स्पष्ट भाष्य केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून सोसायटी गटातून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख उतरले होते; तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जयंत पाटील यांनी शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांना आखाड्यात उतरवले होते. ही निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची झाली होती. यात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला होता. यावर आत्तापर्यंत देशमुखबंधूंनी भाष्य केले नव्हते.

मात्र देशमुखवाडी सोसायटीच्या निवडणूक प्रचार बैठकीत अमरसिंह देशमुख यांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव करण्यासाठी रचलेले कारस्थान आणि व्यूहरचनेचे गुपित उलगडले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेला आपला पराभव करण्यासाठी आणि देशमुखांना घरी बसवण्यासाठी जिल्ह्यातील सारं गडी एकत्र आलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, अजून सांगतोय, भाजप, आमदार, खासदार आणि मंत्री ही सगळ गडी एक झाली, तेव्हा तीस-चाळीस वर्षांनी आपला पराभव झाला. देशमुखांचा पराभव करणं एवढं सोपं नाही. आज खासदारांजवळ फिरताना जे दिसत आहेत, ते त्यावेळी तिकडे पळत होते.

भाजपचे मतदार सुद्धा त्यावेळी तिकडे गेले होते. ही निवडणूक अशी-तशी झाली नव्हती. राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यासाठीच जिल्ह्यातील सारी मंडळी एकत्र आली होती.’’ अमरसिंह देशमुख यांनी थेट नाव न घेता पालकमंत्री जयंत पाटील यांच्यापासून आमदार अनिल बाबर यांच्याबरोबरच खासदार संजय पाटील समर्थक-कार्यकर्ते आणि स्थानिक भाजपचे समर्थक कार्यकर्त्यावर निशाणा साधला. त्यांनी पक्षातूनही गद्दारी झाल्याची खदखद व्यक्त केली.

Web Title: Atpadi Mp And Bjp Responsible Rajendra Anna Defeat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top