सांगली जिल्ह्यात नऊ महिन्यात 255 महिलांवर अत्याचार 

शैलेश पेटकर 
Friday, 25 September 2020

देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा आलेखही वाढल्याचे समोर आले आहे.

सांगली : देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा आलेखही वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात 255 महिलांनी अत्याचाराची फिर्याद दिली आहे. त्यात 62 महिलांनी बलात्कार तर 193 महिलांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सध्या कडेगाव येथील पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस याने एका तरुणीस फूस लावून बलात्कार केला असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हसबनीस सध्या पसार आहे, मात्र त्यानिमित्ताने महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. नवीन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पदभार स्विकारताच भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी महिला अत्याचाराकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या महिला अत्याचार घटनांचा मागोवा घेतला असताना गंभीर प्रकार समोर आले. तुंग येथे एका बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. कडेगाव तालुक्‍यात दोन वृद्धांनी एका चिमुकलीवर बलात्कार केल्याने ती गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. न्यायालयाने या मुलीचा गर्भपात करण्यास परवानगी दिल्यानंतर हे प्रकरण राज्यात सगळीकडे चर्चेत आले. 

देशात दर पंधरा मिनिटाला बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो, असा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल सांगतो. देशात 2017 मध्ये 32 हजार 500 महिलांवर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल केला गेला. 2018 मध्ये महिलांवरील गंभीर स्वरुपाच्या अत्याचाराच्या घटना 2 लाख 37 हजार 660 इतक्‍या होत्या. राज्यात 2017 मध्ये 31 हजार 376, सन 2018 मध्ये 29723 तर 2019 मध्ये 29 हजार 948 महिला अत्याचाराच्या घटना पोलिस दप्तरी नोंदवल्या गेल्या आहेत. 

महिलांवरील अत्याचाराचा खटला न्यायालयात आल्यानंतर तो सरकारी पक्षातर्फे अतिशय टोकदारपणे लढवला जातोय. त्यामुळे 25 टक्‍क्‍यांहून अधिक गुन्ह्यात शिक्षा लागत आहे. हा आकडा अन्य जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. पोलिस तपास, युक्तीवाद, पुरावे सादर करणे या पातळीवर आपली यंत्रणा गांभिर्याने काम करून महिलांना न्याय देते.'' 
- ऍड. अरविंद देशमुख, जिल्हा सरकारी वकील 

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या काही धक्कादायक घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. कित्येक मुलींना त्यांच्याबाबत लैंगिक अत्याचार होतोय, हेही कळत नाही. तुंगमध्ये अत्याचार करून बालिकेचा खून झाला होता. या स्थितीत मुलींना गुड टच, बॅड टच समजला पाहिजे, यासाठी आम्ही मोहिम चालवली आहे. ती कोरोना संकटात थांबली असली तरी भविष्यात महिला अत्याचाराविरोधात ती अधिक प्रभावी ठरेल. 
- सौ. अर्चना मुळे, समुपदेशक, सांगली

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities against 255 women in Sangli in nine months