esakal | धक्कादायक! सांगलीत कोरोना बाधिताच्या घरावर हल्ला; 7 जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! सांगलीत कोरोना बाधिताच्या घरावर हल्ला; 7 जणांवर गुन्हा

धक्कादायक! सांगलीत कोरोना बाधिताच्या घरावर हल्ला; 7 जणांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : घराबाहेर लावलेला कोविड-१९ बाधित असा फलक का काढला म्हणून शेजारील दोन कुटुंबियांनी तलवार घेऊन जाऊन दहशत माजवली. कोरोना बाधित रूग्ण, पत्नी, दोन मुली आणि भाऊ यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरावर तसेच गाडीवर दगडफेक करून नुकसान केल्याचा प्रकार घडला. संजयनगर पोलिस ठाण्यात अनिता रामचंद्र मोघे, रितेश रामचंद्र मोघे, रामचंद्र मोघे, साजिद पठाण, साहिल बेलीफ, मुन्ना बेलीप, साज बेलीफ (अभयनगर, सांगली) या सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी माहिती दिली, की अभयनगर येथील एका व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे चाचणी करण्यात आली. त्यामुळे तो बाधित आढळला. त्यानंतर रूग्ण घरीच स्वतंत्र उपचार घेत आहे. महापालिका प्रशासनाने रूग्णाच्या घराबाहेर कोविड-१९ बाधितचा फलक लावला आहे. वादळी-वारे आणि पावसामुळे फलक खाली पडला. कुटुंबियांनी तो बाजूला ठेवला. घराबाहेर फलक नसल्यामुळे शेजारील अनिता मोघे यांनी फलक का काढून ठेवला म्हणून जाब विचारला. इतरांना देखील हा प्रकार सांगितला. इतरांनी देखील विचारणा केली. शुक्रवारी रात्री रूग्णाच्या पत्नीने अनिता यांना इतरांना कशाला फलक काढला म्हणून सांगताय. पावसामुळे तो पडल्यामुळे बाजूला ठेवलाय असे सांगितले. त्यावरून वाद सुरू झाला.

हेही वाचा: इस्लामपुरात बुधवारपासून जनता कर्फ्यू; व्यवहार राहणार बंद

दरम्यान, अनिता मोघे, पती रामचंद्र, मुलगा रितेश आणि शेजारीस साजिद, साहिल, मुन्ना आणि साज एकत्र जमले. सोबत तलवारीही बाहेर काढल्या. त्यानी रूग्णाच्या घरावर हल्ला चढवला. घरावर दगडफेक केली. रूग्णाची पत्नी, दोन मुली यांना मारहाण केली. रूग्ण बाहेर आल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ केली. रूग्णाचा भाऊ सॅनिटायझर देण्यासाठी आला होता. त्याने मध्यस्थी केल्यानंतर त्यालाही मारहाण करून गाडीची तोडफोड केली. संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान रूग्णाच्या मुलीने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

loading image