वाळू तस्करांचा आटपाडीत मंडल अधिकारी-तलाठ्यांवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

तहसीलदार सचिन लंगुटे यांना आटपाडीत खाटकाळ मळा येथे माणगंगा नदीच्या काठावर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

आटपाडी (सांगली ) ः वाळू तस्करांनी येथील मंडल अधिकारी पांडुरंग रघुनाथ कोळी (रा. आटपाडी) व तलाठी माळी यांच्यावर ट्रॅक्‍टर व दुचाकी अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोघेही नदीपात्रात पळून जाताना पडून जखमी झाले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी ः तहसीलदार सचिन लंगुटे यांना आटपाडीत खाटकाळ मळा येथे माणगंगा नदीच्या काठावर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी श्री कोळी यांना कारवाईचे आदेश दिले. ते तलाठी माळी यांच्यासह नदीपात्रात गेले असता चिखलात वाळूने भरलेला ट्रॉली व ट्रॅक्‍टर दिसला. अधिकाऱ्यांना पाहताच ट्रॅक्‍टर चालकाने पळ काढला. त्यानंतर काही वेळातच ट्रॅक्‍टर मालक उदय देशमुख आणि गंड्या देशमुख दोघे मोटरसायकलवरून घटनास्थळी पोहोचले.

अधिकाऱ्यांनी त्यांना ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. यावर दोघांनीही अधिकाऱ्यांना दमदाटी सुरू केली तसेच ट्रॅक्‍टरच्या आडवे आल्यास मारण्याची धमकी दिली आणि ट्रॅक्‍टर सुरू करून त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात मंडल अधिकारी आणि तलाठी रस्त्यावर पडून जखमी झाले.

जवळच उभा असलेल्या गंड्या देशमुख याने दुचाकी अंगावर घालून मारण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी उदय देशमुख आणि गंड्या देशमुख यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack of sand smugglers on Atpadit Mandal Adhikari-Talathas