विजयनगर रस्त्यावरील भूखंडाचा लिलाव 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

विशेष म्हणजे प्रशासनाने सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना याची काहीच सुगाव लागू दिला नाही.

सांगली : मिरज रोडवरील विजयनगर येथील मुख्य रस्त्याला लागूनच असलेला महापालिकेच्या मालकीचा पाच हजार चौरस फुटाच्या मोकळ्या भूखंडाचा लिलाव करण्यात आला आहे. नऊ वर्षांसाठी खासगी व्यक्तीला हा भूखंड दिला जाणार असून 
त्यासाठी वार्षिक साडेसहा लाख रुपये भाड्याची बोली लागल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासनाने सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना याची काहीच सुगाव लागू दिला नाही.

 
महापालिका प्रशासनाने काल (शुक्रवारी) प्रतापसिंह उद्यानातील एका जुन्या इमारतीचा लिलाव केला. भाडेपट्ट्याने ही इमारत देण्याचा घाट घातला असतानाच सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथील मोक्‍याचा भूखंडही भाडेपट्टीने देण्यात आला. दोन्ही जागांची एकाच दिवशी ई लिलाव पध्दतीने बोली लागली होती. भूखंडासाठी साडेसहा लाख रुपये वार्षिक भाड्याची उच्च बोली लागल्याचे सांगण्यात आले. खासगी व्यक्तीला नऊ वर्षासाठी भाडेपट्टीने हा भूखंड देण्यात येणार असून त्यावर बांधकामासही परवानगी दिली जाणार आहे. लिलावाची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली आहे. 

महासभेत ठराव करुन आयुक्तांना उत्पन्न वाढीसाठी दुकान गाणे, खुल्या जागा व अन्य मालमत्तांच्या माध्यमातून लिलाव प्रक्रिया राबवण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासन नावाखाली महापालिकेच्या मोक्‍यांच्या जागांचे लिलाव काढत आहे. मात्र हे करताना सत्ताधारी भाजपला त्याची काहीच माहिती दिली जात नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, गटनेते या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनाही लिलावाबाबत काहीच कल्पना नसल्याचे समजते. त्यामुळे लिलाव प्रक्रिया पुर्ण होत असताना सत्ताधारी भाजपचे डोळे खाडकन उघडले आहेत. त्यांनी या लिलावाला विरोध दर्शविला आहे.

महासभेने आयुक्तांना लिलावाचे अधिकार दिले असले तरी त्याला अंतिम मान्यता महासभेत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महासभेत भाजप हे दोन्ही लिलाव रद्द करणार का? याकडे लक्ष आहे. 

 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पंगतीत भाजपही 
कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना महापालिकेचे मोकळे भूखंड धनदांडग्यांच्या घशात घालण्यात आल्याच्या चर्चा होतात. विरोधकांनीही आवाज उठवूनही काही भूखंड बिल्डरांना वाटण्यात आले. पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपच्या सत्तेत महापालिकेचा कारभार पारदर्शी असेल असे वाटत होते. मात्र महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मोक्‍याच्या जागांचे लिलाव करुन त्या खासगी लोकांच्या घशात घालण्याची परंपरा भाजपच्या सत्ताकाळातही कायम राहिल्याचे दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auction of vacant land on Vijayanagar Road