"अगस्ती'चा प्रदूषणमुक्त इथेनॉल प्रकल्प  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Augusti's pollution-free ethanol project

"अगस्ती'चा प्रदूषणमुक्त इथेनॉल प्रकल्प 

अकोले : अगस्ती साखर कारखान्याचा प्रदूषणमुक्त इथेनॉल प्रकल्प अवघ्या 11 महिन्यांत पूर्णत्वास गेला. लवकरच कारखान्यात इथेनॉलनिर्मिती सुरू होणार आहे. अगस्ती कारखान्याची 1991मध्ये स्थापना झाली व 5 डिसेंबर 1992 रोजी पहिल्या हंगामाची सुरवात झाली. कारखाना स्थापनेस 28 वर्षे पूर्ण होत आहेत. कुठलीही उपपदार्थनिर्मिती नसताना कारखान्याने ऊसउत्पादकांना योग्य दर दिला. शेतकऱ्यांना अधिक चांगला दर देता यावा, यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी कारखान्यात प्रदूषणमुक्त इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. 

महत्त्वाकांक्षी प्रकल्प 
राज्यापासून केंद्रापर्यंत जाऊन प्रकल्पाला मान्यता व मंजुरी मिळवून 8 मार्च 2019 रोजी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. बघता बघता केवळ 11 महिन्यांत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिला. या आठवड्यात ठेकेदार कंपनी चाचणी घेणार असून, यंदाच्या हंगामातच कारखान्याची इथेनॉलनिर्मिती सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे तालुक्‍यातील तरुणांना रोजगार, तर ऊसउत्पादकांना जास्त दर देता येणार आहे. 

90 लाख लिटरच्या टाक्‍या 
"शून्य टक्के प्रदूषण' या धर्तीवर या प्रकल्पाची उभारणी केली आहे. 90 लाख लिटर क्षमतेच्या लोखंडी टाक्‍या उभारल्या असून, उसापासून साखर व मोलॅसेसपासून दररोज प्रत्येकी 30 हजार लिटर अल्कोहोल, इथेनॉल व "ईएनए' तयार होणार आहे. प्रकल्पातून रोज 3 लाख लिटर पाणी बाहेर पडणार असून, हे पाणी 90 लाख लिटर क्षमतेच्या मोठ्या टाक्‍यांमध्ये साचविले जाईल. टाक्‍यांमधून मिळणाऱ्या गॅसचा उपयोग बॉयलरसाठी इंधन म्हणून उपयोगात येईल. प्रकल्पातील अस्वच्छ पाण्याचे शुद्धीकरण करून ते पुन्हा आसवनी प्रकल्पासाठी वापरले जाईल. उरणाऱ्या पाण्यातून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची कोणतीही दुर्गंधी जाणवणार नाही, असा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. 

काम अंतिम टप्प्यात 
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. या प्रकल्पामुळे ऊसउत्पादकांना अधिक ऊसदर देता येणार आहे, असे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सांगितले. 
ेहेही वाचा - आठ लाख नवरा-बायको एकमेकांना फसवतात, डेटिंगसाठी ऍपचा वापर