esakal |  "ते' स्पीकर का उतरविले?
sakal

बोलून बातमी शोधा

To avoide "Political" use  those speaker removed

इस्लामपूर  येथे स्पिकरवरुन लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन व्हावे यासाठी उभारण्यात आलेला मनोरा आणि त्यावरील स्पीकर हटविण्याची नामुष्की पोलिसांवर आली.

 "ते' स्पीकर का उतरविले?

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर : येथे ज्या परिसरात कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी लोकांमधील भीती कमी व्हावी यासाठी स्पिकरवरुन लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन व्हावे यासाठी उभारण्यात आलेला मनोरा आणि त्यावरील स्पीकर हटविण्याची नामुष्की पोलिसांवर आली. स्पीकरचा होणारा 'राजकीय' वापर आणि त्यातून निर्माण होणारे मतभेद याचा विचार करून पोलिसांनी हा निर्णय घेतला. पोलिसांच्या संकल्पक भूमिकेतून निर्माण झालेला हा उपक्रम अल्पायुषी ठरला आहे. 

येथे ज्या गांधी चौक आणि गणेश भाजी मंडई परिसरात कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी लोकांमधील भीती कमी व्हावी यासाठी स्पिकरवरुन लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी मार्गदर्शनपर माहिती आणि प्रेरणादायी भजन आदींचा वापर केला जात होता. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची ही कल्पना होती. या स्पीकरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'मन की बात'चे प्रसारण शिवाय अन्य आवाहने केले जात होते. परंतु या भागातील लोकांचे हे प्रबोधन अल्पायुषी ठरले. अवघ्या चारच दिवसात पोलिसांना हे स्पीकर काढून ठेवावे लागले. 

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे एकूण 25 कोरोनाबधित रुग्ण आढळल्याने अत्यंत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन येनकेनप्रकारेण उपाययोजना राबवून लोकांना दिलासा देण्यासाठी धडपडत आहे. गांधी चौक आणि भाजी मंडई परिसरातील रुग्णांच्या राहत्या घराच्या व व्यापाराच्या ठिकाणी जवळपास साडे सातशे मीटर एरिया पूर्ण सील केला असून त्यांचा आजिबात बाहेर संपर्क येणार नाही, अशी दक्षता घेण्यात आली आहे.

29 ते 31 मार्च दरम्यान शहर पूर्ण लॉकडाऊन केले असताना कोरोनाबधित परिसरात वीस फूट उंचीचे दोन मनोरे उभारले होते. चार स्पीकर बसवून त्याद्वारे लोकांचे प्रबोधन, जागरुकतेविषयी मार्गदर्शन, भजन आदींचा वापर करून लोकांच्या मनातून भीती निघून जावी, यासाठी प्रयत्न केले जात होते. लोकांमध्ये त्यामुळे समाधानकारक भावना होत्या. मात्र या स्पीकरचा 'राजकीय' वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सावधगिरी म्हणून हे स्पीकरच काढून टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.