अँड्रोईड मोबाईल नसणारे ऑनलाईन शिक्षणापासून दूर 

दीपक पवार
Thursday, 30 July 2020

ऑनलाईन शिक्षण सर्वच मुलांपर्यंत पोचत नसल्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यानंतर प्रगत आणि अप्रगत असे दोन गट समोर येण्याची शक्‍यता आहे.

इटकरे : ऑनलाईन शिक्षण सर्वच मुलांपर्यंत पोचत नसल्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यानंतर प्रगत आणि अप्रगत असे दोन गट समोर येण्याची शक्‍यता आहे. आता कुठे विद्यार्थी आणि पालक ऑनलाईन अभ्यास प्रक्रीया समजून घेत आहेत. तोवरच शाळांचा बराचसा अभ्यासक्रम "शिकवून' संपला आहे. त्यामुळे यातून मागे राहिलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अध्यापन होणार का ? असा प्रश्‍न समोर येत आहे. वेळेचे बंधन आणि अभ्यासाची सक्ती नसल्यामुळे मोबाईलची सुविधा असूनही अनेक विद्यार्थी "ऑनलाईन'मध्ये सहभागी झालेले नाहीत. 

जूनच्या मध्यावर सुरु होणारे शैक्षणिक वर्ष यंदा कोरोना पार्श्‍वभुमीवर जुलै संपला तरी सुरु झालेले नाही. कधी सुरु होणार या बाबत शाश्‍वत माहितीही नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी पालकांच्या मोबाईलवर त्या-त्या इयत्तेसंदर्भातील अध्यापनाच्या लिंक्‍स पाठवल्या जात आहेत. विद्यार्थी ती लिंक ओपन करुन त्याद्वारे माहिती घेत आहेत. पण सर्वच विद्यार्थ्यांकडे अँड्राईड मोबाईल उपलब्ध नाही.

अनेकांचे पालक रोजंदारी, मजुरी किंवा तत्सम सर्वसाधारण कामे करतात. त्यांच्याकडे केवळ संवाद साधण्याइतपत उपयोगी पडेल असे मोबाईल असतात. त्यामुळे या पालकांच्या मुलांपर्यंत ऑनलाईन अभ्यासातील अवाक्षर पोहचलेले नाही. अशा पालकांची मुले देखील अजून सुटीच अनुभवत आहेत. शाळेतून पुस्तके देण्यात आली आहेत. मात्र, अभ्यासाची सक्ती नाही की उतारा नाही. कुठून तरी अभ्यासक्रमाच्या लिंक्‍स मिळाल्या तरी पाहिल्या जातातच याचीही शाश्‍वती नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईनची सुविधा नसल्यामुळे या प्रक्रीयेत सहभागी झालेली नाहीत. 

दुसरीकडे ही सुविधा उपलब्ध असलेली बरीच मुले शाळेकडून आलेल्या लिंक वरवर पाहतात. लिंकद्वारे सुरु होणारा युट्युबवरील भाग गांभीर्याने पाहत नाहीत. या प्रक्रीयेतून होणाऱ्या अभ्यासकडे लक्ष देण्यात पालकांनाही मर्यादा येत आहेत. 

शाळा प्रशासनाची भुमिका काय ? 
कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर प्रत्यक्ष शाळा सुरु होतील, तेव्हा अभ्यासक्रम पहिल्यापासून शिकवला जाणार की ऑनलाईन प्रक्रीयेपर्यंतचा सोडून पुढील शिकवणार या बाबत संदिग्धता आहे. शाळा बंदच्या कालावधीत झालेला अभ्यासक्रम गृहीत धरुन पुढील अध्यापन सुरु राहिल्यास ऑनलाईन प्रक्रीयेपासून दूर राहिलेले अनेक विद्यार्थी अप्रगत म्हणून पुढे येतील. त्यावर शाळा प्रशासनाची भुमिका काय असाही प्रश्‍न पुढे येत आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Away from online education without Android mobile