आयुर्विन पूल कमकुवत, पूर पाहायला येणाऱ्यांना रोखा 

विष्णू मोहिते 
Friday, 7 August 2020

कृष्णा नदीतील वाढणारी पाणीपातळी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. कमकुवत झालेला पूल आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी पाहायला येणाऱ्या लोकांना अटकाव करण्याची गरज आहे.

सांगली : कृष्णा नदीतील वाढणारी पाणीपातळी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. कमकुवत झालेला पूल आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी पाहायला येणाऱ्या लोकांना अटकाव करण्याची गरज आहे. कोरोना साथीतही चार दिवसांपासून टपऱ्या आणि गाडे सुरू झाल्याने खाऊच्या पदार्थांची विक्री होणार नाही, याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित विभागांना आदेश देण्याची गरज आहे. 

कोयना पाणलोट क्षेत्रात आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नदीची पातळी झपाट्याने वाढते आहे. सांगलीत दुपारी चारला आयर्विन पुलावरील पाणीपातळी 23.2 फुटांवर पोचली होती. ती आणखी वाढणारच आहे. कृष्णा नदीची पातळी वाढू लागल्यावर नागरिक नेहमीच गर्दी करतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यावर पोलिसांसह सर्व संबंधित विभागांनी तातडीने अटकाव करण्याची गरज आहे. 

कोरोना साथीच्या काळात लोकांना गर्दी करू देणेही यंदासाठी धोक्‍याची घंटा ठरू शकेल. पाणी पाहायला गेल्यावर परिसरात मोठ्या प्रमाणात छोट्या व्यवसायिकांकडून विक्रीसाठी गाडे, टपऱ्या लावल्या जातात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे त्याची काहीच हालचाल न होऊ देणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे, त्यात काही त्रुटी नाहीत, मात्र दोन्ही बाजूंना आलेल्या फुटपाथखालील स्लॅब काही ठिकाणी निखळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. फार मोठ्या प्रमाणात नागरिक सदर फुटपाथ व त्या ठिकाणी असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनवर उभे असतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.'' 
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurveda Pool Weak, prevent flooding