esakal | बाबर, घोरपडेंनी हमी दिली तरच सांगली झेडपीत बदल; भाजप सावध
sakal

बोलून बातमी शोधा

Babar, change in Sangli ZP only if Ghorpade guarantees; BJP aware

सांगली: जिल्हा परिषदेत अध्यक्ष, पदाधिकारी बदलाबाबत भाजप प्रचंड सावध भूमिकेत आहे.

बाबर, घोरपडेंनी हमी दिली तरच सांगली झेडपीत बदल; भाजप सावध

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्हा परिषदेत अध्यक्ष, पदाधिकारी बदलाबाबत भाजप प्रचंड सावध भूमिकेत आहे. बदलासाठी भाजपला शिवसेनेच्या आमदार अनिल बाबर गट आणि माजी आमदार अजितराव घोरपडे गटाने साथ देण्याची हमी दिली तरच बदल संभवतो. अन्यथा, शेवटच्या वर्षात राज्याप्रमाणे येथेही महाविकास आघाडी पॅटर्न राबवला जाईल, अशी धास्ती प्रमुख नेत्यांना आहे. त्यामुळे हा विषय केवळ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत आता मर्यादित राहिलेला नाही. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील मिळणार का, हेही महत्त्वाचे असेल. 

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची पहिली बैठक गेल्या आठवड्यात झाली. आता दुसऱ्या टप्प्यात 25 फेब्रुवारीला चर्चा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले आहे. 17 पेक्षा जास्त सदस्यांनी बदलासाठी अनुकूल भूमिका घेतली आहे. सरिता कोरबू समर्थकांनी अध्यक्षपदासाठी; तर संपतराव देशमुखांनी उपाध्यक्षपदासाठी आणि आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख गटाच्या अरुण बालटे समर्थकांनी सभापतिपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

भाजपचा हा डाव स्वबळावर खेळणार नसल्याने खरी अडचण आहे. त्यात आमदार अनिल बाबर यांचे तीन, अजितराव घोरपडे यांचे दोन सदस्य अत्यंत महत्वाचे भूमिका बाजावणार आहेत. त्यांनी बदल करण्यास अनुकूलता दर्शवली तरच भाजप विचार करेल. अन्यथा, हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याची भूमिका घेतली जाणार नाही, असाच चंद्रकांत पाटील यांचा पत्रकार परिषदेतून सूर होता. 

आता बाबर आणि घोरपडे यांच्याशी बोलायचे कुणी? त्यांना विश्‍वासात घेणार कोण? ज्यांना पद हवे त्यांनी त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आमदार सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख आदींच्या माध्यमातून चर्चा खुल्या करण्याचा प्रयत्न आहे. खासदार संजय पाटील यांना अनुकूल करण्यासाठी धडपड केली जात आहे.

अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती आशा पाटील, सुनीता पवार यांच्या गोटात शांतता आहे. त्यांना पदावर राहण्यासाठी स्वतःला काही करावे लागणार नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने हालचाली केल्या तरच त्यांची खुर्ची मजबूत होणार आहे. सभापती प्रमोद शेंडगे यांनी सगळ्यासाठी आपण तयार असल्याचे सांगून बदलाची मागणी करणाऱ्या गटासोबतच चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. 

जिल्हा परिषदेतील संख्याबळ 

  • भाजप युती : 26 
  • रयत आघाडी : 4 
  • कॉंग्रेस : 8 
  • राष्ट्रवादी : 15 
  • शिवसेना (बाबर) : 3 
  • घोरपडे गट : 2 
  • स्वाभिमानी : 1 

संपादन :  युवराज यादव