‘आंबेडकरां’ची शाळा जुन्या राजवाड्यात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

प्रतापसिंह हायस्कूल जुन्या राजवाड्याच्या वसतिगृहात सुरू करण्यासाठी या दगडी इमारतीची दुरुस्ती करावी लागणार होती. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून २२ लाखांची तरतूद करून ते काम सुरू केले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात शाळा तेथे सुरू करण्याचा मानस आहे.
- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा 

सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला आता झळाळी मिळणार आहे. जुन्या राजवाड्यातील वसतिगृह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून, त्यासाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा आता दगडी इमारतीत सुरू होणार आहे. 

प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी १८२४ मध्ये बांधलेल्या जुना राजवाड्यात १८५१ मध्ये सातारा हायस्कूल सुरू झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सात नोव्हेंबर १९०४ रोजी भिवा रामजी आंबेकर या नावाने तेथे प्रवेश घेतला. त्यांनी १९०४ पर्यंत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण या शाळेत घेतले. त्यानंतरही या शाळेतून लाखो ‘भिवा’ घडत आहेत. शतक महोत्सवात १९५१ मध्ये या शाळेचे नाव ‘छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह हायस्कूल’ असे करण्यात आले. सध्या ही शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविली जात आहे. 
थोरले प्रतापसिंह महाराजांनी बांधलेले वैभव आता मोडकळीस आले आहे. याच राजवाड्यात सुरू असलेले प्रतापसिंह हायस्कूल आता धोकादायक स्थितीत सुरू आहे. 

या राजवाड्याला पूर्वीप्रमाणे रूप देण्यासाठी जिल्हा परिषदेने आठ कोटी ३० लाखांचा आराखडा सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाकडे जूनमध्ये पाठविला होता. मात्र, त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. 

जुन्या राजवाड्यात १६ खोल्या असलेली एकमजली दगडी इमारत आहे. तिच्या भिंती चांगल्या असल्या तरी फरशी, दरवाजे, लाकूड, कौले आदी खराब झाल्या आहेत. त्याची दुरुस्ती करून त्यामध्ये शाळा भरविण्यासाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून २२ लाखांची तरतूद केली होती. त्याचे आता दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यामध्ये पत्रा बदलणे, फरशा, खिडक्‍या, दरवाजे बसविणे तसेच सिमेंटचा गिलावा करणे आदी कामे केली जात आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

Web Title: babasaheb Ambedkar Education Pratapsinh High School Palace