घरी दिलेल्या पोषण आहारात खराब तांदूळ, किडका हरभरा 

अजित झळके
Friday, 11 September 2020

कोरोना संकट काळात शाळा बंद असल्याने उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना घरीच देण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच धान्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत.

सांगली : कोरोना संकट काळात शाळा बंद असल्याने उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना घरीच देण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच धान्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यात तांदूळ खराब असून हरभरा किडका असल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे वितरण थांबवा आणि खराब धान्य परत पाठवा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यात 15 मार्चपासून प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद करण्यात आल्या. कोरोना संकट काळामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्या काळात धान्याचे एकवेळ वितरण झाले होते. सप्टेंबरच्या प्रारंभी उन्हाळी सुटीतील धान्य दाखल झाले. त्यात तांदूळ आणि हरभऱ्याचा समावेश होता.

हे धान्य काही ठिकाणी चांगले आले आहे, मात्र अनेक ठिकाणाहून त्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल सौ. कोरे यांनी घेतली. जिल्हाभरातील शाळांमधून माहिती घेतली. पालकांशी संवाद साधला. त्यातून अनेक ठिकाणी खराब धान्याच्या तक्रारी आल्या. प्राथमिक शाळांची संख्या सुमारे अठराशेच्या घरात आहे. शाळा बंद असल्या तरी या मुलांना पोषण आहार सुरु ठेवण्यात आला आहे. अद्याप जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे धान्य यायचे बाकी आहे. 

एकाही मुलाला खराब धान्य मिळता कामा नये, असे आदेश दिले आहेत. खराब असलेले सर्व धान्य परत मागवले असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.'' 
- प्राजक्ता कोरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad rice, wormwood gram in the nutritional diet given at home