
पसार काळात निरीक्षक हसबनीस याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
कडेगाव (जि. सांगली)- येथे अठ्ठावीस वर्षीय तरुणीला स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी चार महिने पसार झालेला संशयित पोलिस निरीक्षक विपीन व्यंकटेश हसबनीस (वय 54, रा. मोरेवाडी, ता. करवीर जि. कोल्हापूर) हा पोलिसांना शरण आला. मुंबई उच्च न्यायालयात दोन दिवसापूर्वी अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर तो आज कडेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला तत्काळ अटक करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिचेवर बलात्कार केला असल्याची फिर्याद निरीक्षक हसबनिस याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तरुणीच्या तक्रारीवरून निरीक्षक हसबनिस याच्याविरुद्ध 28 ऑगस्ट 2020 रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी निरीक्षक हसबनीस पसार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठवली होती. परंतू तो गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता.
पसार काळात निरीक्षक हसबनीस याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे निरीक्षक हसबनिस याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयात सरकारतर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानुसार दोन दिवसापूर्वी निरीक्षक हसबनिस याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला गेला. त्यामुळे तो आता पोलिसांना शरण येणार की सर्वोच्च न्यायालयात जाणार? याकडे लक्ष लागले होते. अखेर निरीक्षक हसबनीस आज पोलिस ठाण्यात शरण आला. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या तपास करीत आहेत. दुपारनंतर निरीक्षक हसबनीसला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.