बळिराजाची कर्जमुक्ती अंतिम टप्प्यात! जखणगाव, ब्राह्मणीची प्रायोगिक चाचणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी कार्यालय, संबंधित बॅंक, सोसायट्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. यादीतील माहिती मान्य असल्यास थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे सुरू होणार आहे

नगर ः महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत केलेल्या कर्जमाफीसाठी प्रायोगिक चाचणीसाठी नगर तालुक्‍यातील जखणगाव, राहुरी तालुक्‍यातील ब्राह्मणी या गावांची निवड केली आहे. ही चाचणी गुरूवारी (ता. 20) होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. 28) पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी कार्यालय, संबंधित बॅंक, सोसायट्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. यादीतील माहिती मान्य असल्यास थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे सुरू होणार आहे. त्यामुळे बळिराजासाठीची कर्जमुक्ती योजना अंतिम टप्प्यात आली आहे. 

जिल्ह्याने घेतली आघाडी 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 30 सप्टेंबर 2019 अखेरच्या थकित व पुनर्गठित केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफी मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे काम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. संबंधित योजना ही आधारबेस योजना आहे. त्यामुळे थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्जदारांना आधार प्रामाणिकरणासाठी बोयोमेट्रिक मशिन आपले सरकार, जिल्हा बॅंकेच्या 297 शाखेत उपलब्ध करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. 

जिल्ह्यातील कर्जमाफीचा लेखाजोखा 
कर्जदार संख्या-260604 
कर्जमाफीची एकूण रक्कम (लाखात)-204790.72 
आधारलिंक झालेली संख्या -259312 
आधारलिंक न झालेली संख्या -1292 
पोर्टलवरील कर्ज खात्यांची संख्या-353058 
उपलब्ध बायोमेट्रिक मशिन-2000 

तक्रार असेल तर करा 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र कर्जदार शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीतील माहिती मान्य असल्यास थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे सुरू होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची माहितीविषयी तक्रार आहे. त्यांची दखल जिल्हास्तरीय समितीकडून घेतली जाईल. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balaji Raja's debt relief in the final phase