
लहानपणापासून बाळू यांना डाव्या पायाला पोलिओ आहे तर पत्नी मालन तिच्या हाताला भाजल्याने वीस वर्षापूर्वी तिचा उजवा हात खांद्यापासून काढण्यात आला. त्यामुळे पती पायाने तर पत्नी हाताने अपंग आहे.
सांगली : आधाराला मुलगा नाही. कष्टाला शरीर आणि अपंगत्व साथ देत नाही. हक्काचा निवारच कोसळलाय. आर्थिक परिस्थिती नाही. रात्री घरात झोपलं तर आभाळ दिसतंय.चंद्राच्या प्रकाशानं सारं घर उजाळतय. घराचा उर्वरित भाग अंगावर कधी कोसळलं यामुळे रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नाही. कायम जीव मुठीत घेऊन पडक्या घरात राहून एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्यावर कोणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही कहाणी आहे खेड( ता. शिराळा ) येथील बाळू बंडू माळी व मालन या दिव्यांग दाम्पत्याची.
लहानपणापासून बाळू यांना डाव्या पायाला पोलिओ आहे तर पत्नी मालन तिच्या हाताला भाजल्याने वीस वर्षापूर्वी तिचा उजवा हात खांद्यापासून काढण्यात आला. त्यामुळे पती पायाने तर पत्नी हाताने अपंग आहे. त्यांना तीन मुली आहेत.त्या ही विवाहित आहेत. त्यांच्या घराची भिंत २०१९ ला झालेल्या अतिवृष्टी मध्ये पडली. त्यांनी ग्रामपंचायतकडे आर्थिक भरपाई ऐवजी घरकुलाची मागणी केली. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने त्यातच घरात त्यांना आपला संसार करावा लागत आहे.
दोन वर्षे झाली. अद्याप त्यांना घरकुल मंजूर झालेले नाही. बाळूचे वय ७१ व मालनचे ६५ वय असून पदरी असणारे अपंगत्व व वयोवृद्ध झाल्याने शारीरिक श्रमाची कामे होत नाहीत. जमीन एक एकर पण तीही कोरडवाहू . शेती जमत नसल्याने वाट्याने दिली आहे. त्यामुळे पै पाहुणे व रेशनच्या मिळणाऱ्या धान्यावर उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांना घरकुल मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे पण तो अद्याप मंजूर झालेला नाही
हेही वाचा- कुलूप फोडल्यावर मिळाल्या गहाळ फायली ; रत्नागिरीतील प्रकरणाला वेगळेच वळण -
शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका आहे. यावर्षी पुन्हा पावसाळा सुरू झाल्यास घर जमीनदोस्त होण्याची भीती आहे .त्यांना दुसरीकडे राहायला जागा नसल्याने त्यांना घरकुल मंजूर होणे गरजेचे आहे. यासाठी खास बाब म्हणून लोकप्रतिनिधी प्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून त्यांना घरकुल देणे गरजेचे आहे. पायाला पोलिओ असून ही बाळू यांना अजून अपंगत्वाचा दाखल मिळालेला नाही.
माळी यांच्या घरकुलाचा प्रस्ताव आम्ही पाठवला असून त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
ग्रामसेविका माधुरी पाटील
संपादन- अर्चना बनगे