बेडगमधील केळी चालली दुबईला... 

विनोद शिंदे
Friday, 25 September 2020

बेडग (ता. मिरज) येथील सुजाता अनिल कोटीजा यांनी त्यांच्या शेत जमिनीत पिकवलेली केळी दुबईला निर्यात होत आहेत.

म्हैसाळ (जि. सांगली) : सध्या सर्वत्र कोरोना महामारीच्या विळख्यात आख्खं जग सापडलेलं आहे. सगळीकडे मंदीचे चित्र दिसत असतना, या संकटात देखील संधी निर्माण करुन यशस्वी होणारेही सापडत आहे. बेडग (ता. मिरज) येथील सुजाता अनिल कोटीजा यांनीही त्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यांच्या शेत जमिनीत पिकवलेली केळी दुबईला निर्यात होत आहेत. महिला शेतकरी म्हणून उत्पादीत केलेल्या शेतमालाची परदेशात निर्यात होण्याच्या प्रयत्नांना यामुळे त्यांना यश आले आहे. 

सौ. कोटीजा यांनी केळी पिकाचे तज्ज्ञ असलेले विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली. त्यांनी सांगितले की, सुरवातीपासूनच केळीची निर्यात करायचीच या हेतूनेच योग्य व्यवस्थापन केले. ऑगस्ट 2019 मध्ये जी-9 या केळीच्या वाणाची लागवड सात बाय पाच अंतराच्या सरी सोडून करण्यात आली. लागवडी वेळी शेण खतांचा मुबलक प्रमाणात वापर करण्यात आला. योग्यरीतीने खत, पाणी आदींचे नियोजन केले.

हे करत असताना अत्यल्प प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला. ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले. केळी पिकावर येणारा करपा आणि मुळ कूज या रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेत, यावर योग्य औषधांची फवारणी देखील करण्यात आली. पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून घड पट्टी व्यवस्थापन देखील केले. केळी घडाचे रोगांपासून संरक्षण होण्यासाठी घडाला संरक्षक पिशव्या बांधलेल्या. 

हमखास फायदा मिळतोच
सरासरी एकरी 40 ते 45 टनाचे उत्पादन मिळालेले असून, प्रति टन अकरा हजार रुपयांचा भाव मिळाला. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यांना हमखास फायदा मिळतोच हा माझा अनुभव आहे. 
- सुजाता कोटीजा, महिला शेतकरी, बेडग 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bananas from Bedag-Sangali going to Dubai ...