कडकनाथ घोटाळ्यातील महारयत कंपनीची बॅंक खाती सील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - महारयत ऍग्रो कंपनीवर कडकनाथ कोंबडीपालन प्रकल्पाच्या बहाण्याने व्यावसायिकांची चार कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याला आरोप आहे. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. आज यामध्ये शाहूपुरी पोलिसांनी कंपनीची दोन खाती गोठवली. यामध्ये सुमारे एक कोटीची रक्कम होती. त्यांच्या अन्य खात्यांची चौकशीही सुरू आहे. 

कंपनीचे पदाधिकारी सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही, रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार, शेतकरी आणि व्यावसायिकांबरोबर केलेल्या करारांची चौकशी सुरू आहे. शहरातील स्टेशन रोड येथे मलबार हॉटेलच्या वरच्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे.

पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली असून, काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. कंपनीची इस्लामपूर येथे खासगी बॅंकांमध्ये खाती आहेत. यापैकी एका बॅंकेतील दोन खात्यांची पोलिसांनी तपासणी केली. एका खात्यावरील 30 लाख 95 हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यावरील 63 लाख 57 हजार रुपयांची रक्कम शिल्लक आहे. पोलिसांनी बॅंक अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही खाती गोठवली. कंपनीची अन्य बॅंकांमध्येही खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संशयित सर्व बॅंक खात्यांची चौकशी केली जाणार आहे.

खाती गोठवल्याने कंपनीला रक्कम काढता येणार नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. दरम्यान, इस्लामपूरमध्येही महारयत ऍग्रो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने इस्लामपूर पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. कंपनीच्या संस्थापकांपैकी एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank account of Maharayat company sealed in Kadaknath scam