बापरे... इंजिनची पाहणी न करताच दिले फिटनेस प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- शताब्दी एक्‍स्प्रेसच्या इंजिनचे एक्‍सेल लॉक

- रेल्वे अधिकाऱ्याची होणार चौकशी 

- दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

-  रेल्वे तब्बल चार तास विलंबाने सिकंदराबादला पोचली

सोलापूर : पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्‍स्प्रेसच्या इंजिनचे एक्‍सेल गुरुवारी (ता. 21) लॉक झाल्याने ही रेल्वे तब्बल चार तास विलंबाने सिकंदराबादला पोचली. हा प्रकार गंभीर असल्याने गुटी शेडच्या मेकॅनिकल विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी होणार असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या सिंकदराबाद मुख्यालयातून देण्यात आले आहेत. 

मुंबई- हैदराबाद एक्‍स्प्रेसच्या इंजिनचे एक्‍सेल लॉक होण्याची घटना सोलापूर विभागातील कुर्डुवाडी स्थानकाजवळ 16 वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी मेकॅनिकल विभागाच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यावर कारवाई झाली होती.

दरम्यान, गुरुवारी पुण्याहून सिकंदराबादला निघालेली शताब्दी जेऊर स्थानक परिसरात आली. त्या रेल्वे गाडीच्या इंजिनचे एक्‍सेल लॉक झाल्याने दुरुस्तीसाठी वेळ लागणार होता. त्यामुळे सोलापूर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्डुवाडी येथून दुसरे इंजिन शताब्दी एक्‍स्प्रेसला जोडले. त्यानंतर शताब्दी एक्‍स्प्रेस सोलापूरकडे रवाना झाली. मात्र, सोलापूरला ही गाडी नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तास उशिराने पोचली. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या आदेशानुसार गुटी येथील वरिष्ठ विभागीय अभियंत्याची चौकशी केली जात आहे. 

ट्रिप एकनुसार इंजिनची पाहणीच केली नाही 
एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या देखभाली-दुरुस्तीसाठी दर 15 दिसवसांनी इंजिनची ट्रिप एक प्रकारनुसार देखभाल-दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. मात्र, त्या विभागातील मेकॅनिकच्या अभियंत्याने अशा प्रकारची पाहणी न करताच इंजिन फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्‍स्प्रेसच्या इंजिनचे एक्‍सेल लॉक झाल्याची चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांत होती. 

सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसला आता नवा एलएचबी रेक 
रेल्वे प्रवाशांचा सोलापूर ते मुंबई प्रवास सुरक्षित व आरामदायी व्हावा या उद्देशाने हुतात्मा एक्‍स्प्रेसला एलएचबी रेक बसविण्यात आला. त्यानंतर आता सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसलाही 24 डब्यांचा नवा रेक उपलब्ध झाला असून 3 जानेवारीला तो जोडला जाणार आहे. आणखी दोन रेकची मागणी केली असून काही दिवसांत तो उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या नव्या रेकनुसार एक स्लिपर कोच डबा कमी केला आहे. मात्र, आसन क्षमता 72 वरून 80 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल, असा विश्‍वास रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BAPARE... given the qualification certificate without looking at the engine