
हत्तरगीला इएसआय रुग्णालय स्थापणार!
बेळगाव : राज्यात नवीन १९ इएसआय रुग्णालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात हुक्केरी तालुक्यातील हत्तरगीचा समावेश आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्षांपासून बेळगावला उद्यमबागला ईएसआय रुग्णालय सुरू करण्याची योजना होती. पण, याचा यात समावेश नाही. राज्यातील तालुक्यात आणि भागात इएसआय रुग्णालय सुरू कण्याची योजना आहे. यात राज्यातील १९ ठिकाणांचा उल्लेख असून, त्यात बेळगाव जिल्ह्याचा उल्लेख आहे. हत्तरगीत इएसआय रुग्णालयाची निर्मिती केली जाईल.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या महिन्यात राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी १९ ठिकाणी इएसआय रुग्णालयाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. यानुसार त्याला आता चालना मिळत आहे. कामगार खात्याने याबाबत स्वतंत्र अध्यादेश बजावला असून, यात याबाबतचा उल्लेख आहे. हुबळी आणि दावणगेरीत इएसआय रुग्णालय ५० खाटांचे आहे. त्यांची व्याप्ती वाढवून १०० खाटांचे रुग्णालय करण्यात येईल, असे कामगार खात्याने कळवितानाच १९ ठिकाणी नव्याने इएसआय रुग्णालये सुरू केली जातील. अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्याप्रमाणे निधीची तरतूद केली जात आहे. तसेच, वित्त विभागाकडे मंजुरीला पाठविले. वित्त विभाग हिरवा कंदील दाखविताच प्रत्यक्षात रुग्णालयाची निर्मिती सुरू होईल, अशी माहिती कामगार विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बेळगावचा प्रस्ताव पडला मागे
बेळगावात अशोकनगरला इएसआयचे मुख्य कार्यालय आहे; तर राणी चन्नम्मा सर्कल आणि गोवावेसला वैद्यकीय उपचार केंद्रे आहेत. मात्र, बेळगावला अशोकनगरात असलेले रुग्णालय अद्ययावत केले जावे. तेथील वैद्यकीय उपचार, उपकरण, बांधकाम आणि खाटांची संख्या वाढवली जावी, अशी मागणी आहे. त्याच्या विकासाचा उल्लेख या प्रस्तावात नाही. तसेच, बेळगावात सर्वाधिक औद्योगिक प्रकल्प, कारखाने उद्यमबागला आहेत. त्यासाठी भागात इएसआय रुग्णालयाची निर्मिती केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्रस्तावात याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही मागे जुनी असली तरी परत मागे पडल्याचे दिसते.
इएसआय रुग्णालयासाठी निवडलेले ठिकाण
हत्तरगी (बेळगाव), बागलकोट, गौरीबिदनूर (चिक्कबळ्ळापूर), वसंतनरसापूर (तुमकूर), बटनाळ (मंगळूर), चिंचोळी (गुलबर्गा), राणेबेन्नूर (हावेरी), कोलार व नरसापूर, संडूर (बळ्ळारी), कनकपूर (रामनगर), नौबाद (बिदर), यादगिरी.
Web Title: Basavaraj Bommai Esi Hospital Set Up At Hattargi Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..