रोजच मरताहेत वटवाघळं! कारण..

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 18 November 2019

- निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक 
- चिंताजनक स्थिती असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे 
- दगावत आहेत हजारो पक्षी

सोलापूर : वटवाघुळ.. नाव घेताच किळस वाटणारा प्राणी! आजार पसरवणाऱ्या विविध कीटकांना खाऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा तसेच विविध फळांच्या बिया खाऊन आपल्या विष्ठेतून त्यांची बीजे दूरपर्यंत पसरविणारा निसर्ग चक्रातील महत्त्वाचा घटक. मोठ्या वृक्षांची संख्या कमी होत असल्याने वटवाघळांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. त्यामुळे वटवाघळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वटवाघळांची संख्या कमी होण्यात आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे विजेच्या तारांमध्ये अडकून, शॉक बसून होणारा मृत्यू..!

दगावत आहेत हजारो पक्षी
रोजच्या धावपळीत आपण अशा समस्येचा विचार कधीच करत नाही. पण निसर्गचक्र अबाधित ठेवायचे असेल तर याचा विचार करावाच लागणार आहे. विजेच्या दोन तारांमधील अंतर वाढविल्यास वटवाघळांसह मोठ्या पक्ष्यांना असणारा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येला अधिक ऊर्जेची गरज असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे वाढतच आहे. त्याबरोबरच विविध पक्षी, वटवाघळांचे वीज तारा, खांबाला धडकून तसेच विजेचा धक्का बसून मृत्यूचे प्रमाणही काळजी करणे इतके वाढत आहे. जगात अशा प्रकारच्या घटना सर्वत्रच घडत आहे. त्यामुळे आययुसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेने 2016 साली वर्ल्ड कॉन्झर्वेशन कॉमर्समध्ये या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे. दरवर्षी विद्युत धक्‍क्‍याने आणि विजेचा खांब धडकून हजारो पक्षी दगावत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 

शिकारी पक्ष्यांचे प्रमाण अधिक
सर्वच प्रकारचे पक्षी अशा घटनांना बळी पडत असले तरी गिधाडे, कुरकुंजे, करकोचे, रोहित पक्षी, माळढोक यासह मोठ्या आकारमानवाले शिकारी पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे. वास्तविक एकाच तारेवर पक्षी बसला तर त्याला काही होत नाही. पण एका तारेवर बसून दुसऱ्या तारेला किंवा विद्युत प्रवाहित भागाला जर त्याचा स्पर्श झाला तर मात्र विजेचा शॉक बसतो, असे दिसून आले आहे. 

तुम्हाला हे माहिती आहे का? 
वटवाघूळ अनेकांना घृणास्पद वाटतात, पण हा निसर्गातील अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे. वटवाघुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत वटवाघळांच्या 41 प्रजातींची नोंद झाली असून यातील आठ प्रजाती संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत आहेत. एक इंच पासून एक फुटापर्यंत आकाराची वटवाघळे असतात. काही वटवाघळे फलाहारी तर काही किटकभक्षी असतात. कीटकभक्षी वटवाघळे डासांसारख्या उपद्रवी कीटक खातात. तसेच सरडे, बेडूक आणि लहान उंदीर सुद्धा खातात. म्हणूनच त्यांची निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका आहे. 

हे आहेत उपाय.. 
- विजेचे खांब, टॉवर धातूचे करू नयेत. 
- विजेच्या तारांना कोटिंग करावे, ज्यामुळे पक्ष्यांना शॉक बसणार नाही. 
- विजेच्या तारांमधील अंतर वाढवावे. 
- रंगीबेरंगी परावर्तक पट्ट्यांचा वापर केला तर पक्षी तारा, खांबांकडे फिरकणार नाहीत. 
- झाडूच्या आकाराचे प्रतिबंधक बसवावे. 
- सर्वांत उत्तम उपाय म्हणजे विद्युत वहन तारा जमिनीखालून न्याव्यात. पक्षी, प्राणी, मानवासहित सर्वजण विजेच्या धक्‍क्‍यापासून सुरक्षित राहतील. 

 हेही वाचा : चंपीने अजगराशी दिली अशी झुंज...

अभ्यासक म्हणतात...
वटवाघळं प्रामुख्याने कीटकांची शिकार करतात. परागकण आणि विविध फळांच्या बिया खाऊन त्यांचा प्रसार करतात. विजेचा शॉक बसून वटवाघळं किंवा अन्य पक्षी दगावल्याचे पाहून दुःख होते. शासनाने या समस्येवर उपाययोजना करावी. नव्याने विजेच्या तारा ओढताना त्यांचे अंतर वाढवता येईल का याचा विचार करावा. 
- डॉ. किशोर वाघमारे, वसुंधरा मित्र 
-- 
अन्नाच्या शोधात पक्षी उंचावरून उडून टेहळणी करत असतात. गरज गवताळ प्रदेशात झाडे नसल्याने त्यांना विजेचे खांब, तारा किंवा टॉवरचा आसरा घ्यावा लागत आहे. विजेचा तारांमधील कमी अंतर, चुकीचे तांत्रिक डिझाईन यामुळे पक्षांचे किंवा वटवाघळांसारखे सस्तन प्राणी बळी जात आहेत. 
- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक 
-- 
सोलापुरात सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वटवाघळ आहेत. त्याठिकाणी बाग केल्याने लोकांची वर्दळ वाढत आहे, त्यामुळे वटवाघळांची अधिवास धोक्‍यात आला आहे. लोकांना पक्षी, प्राण्यांविषयी संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे गैरसमज असतात. माणूस सोडला तर कोणताही प्राणी, पक्षी स्वत:हून हल्ला करत नाही. 
- शिवानंद हिरेमठ, पक्षी अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bat is dying every day! Reason ..