
इटकरे (सांगली)- त्यांनी लॉकडाऊन कडेकोट पाळला, गावात कुणालाही प्रवेश दिला नाही, गावांतर्गतच्या रस्त्याने आणि चोरवाटेने ये-जा करणाऱ्यांवर रात्रंदिवस गस्त घालून पहारा ठेवला, तरीही चोरुन कुणी आले-गेलेच तर त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले. पण शहरातून मायघरी परतण्याला शासनाची परवानगी मिळाली आणि थेट मुख्य मार्गानेच कोरोना गावात दाखल झाला. आता काही झाले तर कुणालाच गावात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय आज या ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर वसलेल्या कुंडलवाडीतला हा प्रकार. कुंडलवाडी गावाने सुरुवातीपासूनच लॉकडाऊन कडकडीत पाळला. ग्रामस्थांनी अत्यावश्यक गरजेपुरतेच बाहेर पडून स्वतःवर बंधने लाऊन घेतली. गावातून तांदूळवाडी, येलूर, ऐतवडे खुर्द या गावांना जोडणारे रस्ते वर्दळीसाठी बंद केले. कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावर नक्की ये-जा होणार हे ओळखून या बंधाऱ्यावर काटेरी झाडेझुडपे बंधारा वाहतुकीसाठी बंद केला. जिल्हा बंदीमुळे या गावातून पलीकडे चावरे, पारगाव, तळसंदे या बाजूला चोरुन प्रवास होत होत होता. याला पायबंद म्हणून ग्रामस्थांनी थेट दिवसरात्र गस्त सुरु केली. पोलिसांनीही ग्रामस्थांना साथ दिली. बंधाऱ्यावरील अडथळे हटवून कुणी ये-जा करत असेल तर त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले. एवढ्या कडेकोट बंदोबस्तात कोरोनाचा शिरकाव होणार नाही अशी ग्रामस्थांची खात्री होती.
शासनाने लॉकडाऊनमधील प्रवासाच्या काही नियमात शिथीलता दिल्यानंतर शहरातील नागरिकांनी गावांकडे कुच केले आहे. कुंडलवाडीतही असाच एक जण मुख्य रस्त्याने दाखल झाला आणि गावात कोरोनाने प्रवेश केला. गावात मुख्य मार्गानेच कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामस्थांनी तब्बल दोन महिने घेतलेले कष्ट वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. तरीही खचून न जाता आलेल्या संकटाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा सज्ज झाले आहेत. आता गावात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. तालुका प्रशासन, कुरळप पोलिस, कोरोना दक्षता समिती, सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील, ग्रामसेविका, येलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.