कोरोना बाधीतांची काळजी घेण्यासाठी अधिक सक्रिय व्हा 

धर्मवीर पाटील 
Monday, 21 September 2020

आपल्या गावाचे कोरोनापासून संरक्षण करणे, आपल्या गावातील कोरोना बधितांची काळजी घेताना त्यांना धीर देण्यात गावो-गावच्या सरपंचांनी अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन जलसंपदामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

इस्लामपुर : आपल्या गावाचे कोरोनापासून संरक्षण करणे, आपल्या गावातील कोरोना बधितांची काळजी घेताना त्यांना धीर देण्यात गावो-गावच्या सरपंचांनी अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन जलसंपदामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. राज्य शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'अभियान अंतर्गत त्यांनी सांगली जिल्ह्यातील 400 सरपंचांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधला. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानमध्ये गावो-गावच्या सरपंचांनी सहभागी होण्यासाठी त्यांनी हा संवाद केला. यात मंत्री पाटील म्हणाले,""माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीम अंतर्गत गावागावातील प्रत्येक कुटुंबास वैद्यकीय पथके भेट देणार आहेत. यामध्ये प्रत्येक ग्रामस्थाचे शारीरिक तापमान व त्यांच्या ऑक्‍सिजन पातळीची तपासणी केली जाणार आहे. तसेच ग्रामस्थांचे प्रबोधनही केले जाणार आहे.'' 

ते म्हणाले,""गावाच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबांतील वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आदी घटकांची विशेष काळजी घ्यायला हवी. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने चांगल्या प्रकारचे मास्क, सॅनिटायझरचा वापर करायला हवा, यासाठी प्रबोधन करा. गावातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गावात गरजूंना मास्क, सॅनिटायझर, औषधे आदी वाटप करायला हवे.'' 

ते म्हणाले,""एखाद्या कुटुंबातील व्यक्ति पॉझिटिव्ह आल्यास त्याला धीर देण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या लक्षणांची तीव्रता को-मॉरबीडीलीटी लक्षात घेऊन डॉक्‍टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेशन किंवा रुग्णालयात दाखल करण्यास मदत करा. सौम्य लक्षणे असलेल्यांना सरसकट रुग्णालयात न दाखल करता होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार द्यावा.'' 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be more proactive in caring for corona infections