esakal | काष्टी सोसायटीत घोटाळा ः पाचपुते पिता-पुत्रांची मॅनेजरला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Beating the manager of Kashti Society for exposing malpractice

गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांचा काहीही संबंध नसताना मोठा हस्तक्षेप वाढला आहे. काही विभागांतील खरेदीत त्यांनी मोठा गोंधळ केला आहे. अनेक व्यापारी व कंपनीचे पत्रव्यवहार प्रताप पाचपुते यांच्या नावेच होत आहेत.

काष्टी सोसायटीत घोटाळा ः पाचपुते पिता-पुत्रांची मॅनेजरला मारहाण

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : काष्टी सेवा संस्थेतील गैरव्यवहार व व्यापारी कमिशन साखळी उघड केल्याच्या रागातून संस्थेच्या सर्वेसर्वा, ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते, त्यांचा मुलगा प्रताप यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार संस्थेचे व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात केली आहे. 

तक्रारीत व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी म्हटले आहे, की काष्टी सेवा संस्थेची उलाढाल मोठी आहे. या संस्थेचा व्यवस्थापक म्हणून ते जवळपास नऊ वर्षांपासून काम करीत आहेत. गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांचा काहीही संबंध नसताना मोठा हस्तक्षेप वाढला आहे. काही विभागांतील खरेदीत त्यांनी मोठा गोंधळ केला आहे. अनेक व्यापारी व कंपनीचे पत्रव्यवहार प्रताप पाचपुते यांच्या नावेच होत आहेत. संस्थेला साहित्य पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कमिशन आणले जाते. त्याबद्दल काही पुरावे असून, प्रताप पाचपुते यांच्या बॅंक खात्यांत व्यापाऱ्यांनी पैसे जमा केले आहेत. 

हेही वाचा - घुंगरांचा आवाज झाला मुका

या बाबत आपण भगवानराव पाचपुते यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर, उलट त्यांनीच आपणास शिवीगाळ व दमदाटी केली. शिवाय गैरव्यवहार उघड केल्याच्या रागातून पगारातही कपात केली. हे सगळे उघड केल्यानंतर प्रताप पाचपुते व त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपणास मारहाण केली. तसेच सोसायटीमधील गोंधळाची चर्चा बाहेर केली, तर जिवे मारण्याची धमकी दिली. प्रताप व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या बदनामीची मोहीम हाती घेतली असूल, चारित्र्यहनन करणारे चुकीचे छायाचित्रे एकत्र करुन ते सोशल मीडियावर टाकण्याचा दबाब टाकत आपणास गप्प बसण्यास भाग पाडत आहेत, असे जालिंदर पाचपुते यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

कारभारात मुलाचा हस्तक्षेप नाही : पाचपुते 

काष्टी सेवा संस्थेचे व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी संस्थेचे दप्तर चोरून नेल्याने त्यांना बडतर्फ केले होते. त्यातून त्यांनी खोटे आरोप करीत तक्रार केली आहे. काष्टी संस्थेच्या कारभारात आपल्या मुलाचा काडीमात्र संबंध नाही. उलट दिलेल्या तक्रारीची सखोल चौकशी व्हावीच. त्याच वेळी जालिंदर पाचपुते व तत्कालिन अध्यक्ष विठ्ठलराव काकडे यांच्या कारभाराचीही चौकशी करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत, असा इशारा भगवानराव पाचपुते यांनी दिला आहे. 

पाचपुते म्हणाले, ""जालिंदर पाचपुते यांनी संस्थेविषयी इतरांना चुकीची माहिती दिली. त्यासाठी संस्थेतून त्यांनी वेळोवेळी दप्तर चोरले असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. हे सगळे आपण नेमलेले अध्यक्ष काकडे व "राष्ट्रवादी'च्या एका नेत्याच्या इशाऱ्यावरून सुरू आहे. जालिंदर पाचपुते यांनी एवढा गोंधळ घातल्यावरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करता, केवळ कामावरून कमी केले. त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे असून, त्यांचा पगार त्यांनी परस्परच कुठलाही ठराव न करता वाढविला होता. तो ठराव करुन नामंजूर केला आहे.'' 

""जालिंदर पाचपुते यांनी गेल्या काही वर्षात सोसायटीत गैरव्यवहार करून, मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता कमाविल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आता पुराव्यानिशी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. सहकारी संस्थेत काम करताना, कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. ज्यांच्याकडे आपल्याविरुद्ध पुरावे आहेत, त्यांनी ते सादर करावेत. नाहक बदनामी करुन सहकार चळवळ बदनाम करू नये,'' असे भगवानराव पाचपुते म्हणाले. 

loading image