बेळगावात ४४५ एचआयव्ही बाधित; २५ गर्भवती महिलांचा समावेश

महेश काशीद
Wednesday, 13 January 2021


एप्रिल ते ऑक्‍टोबरची आकडेवारी; २५ बाधित गर्भवती, ४९ प्रसूती यशस्वी

बेळगाव : जिल्ह्यामध्ये एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२० या काळात ४४५ जणांना एचआयव्ही-एड्‌सची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये तब्बल २५ गर्भवती महिलांचा समावेश आहे. तर याच काळात ४९ एड्‌सबाधित महिलांची प्रसूती झाली आहे.

एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात १ लाख १० हजार ५०९ जणांच्या एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यापैकी ४२,०९३ जणांची चाचणी केली असून त्यात ४२० जणांना एड्‌स झाल्याचे निदान झाले. याच कालावधीत ५६ हजार ९९४ गरोदर महिलांच्या एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५२,१४५ जणांची चाचणी केली असून त्यात २५ गर्भवती महिला एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात यापूर्वी व आता निदान झालेल्या ४९ बाधित महिलांची प्रसूती झाली असून आई व बाळ दोघेही सुखरुप असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

हेही वाचा- Good News:कोल्हापूकरांनो कोव्हॅक्‍सिीन लस दाखल  -

वृद्ध, आजारी व्यक्ती, १० पेक्षा कमी वय आणि गर्भवतींना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे. तसेच या घटकांचा समावेश हायरिस्क रुग्णश्रेणीत केले आहे. त्यामुळे गरोदर महिलांची दर महिन्याला कोरोना चाचणीसह एचआयव्ही चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये २५ जणांना एचआयव्ही झाल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, यंदा एचआयव्ही-एड्‌सबाधितांचे प्रमाण सरासरी १ टक्‍का असून ४४५ जणांना एड्‌स झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी ४३९ जणांची नोंद एआरटी केंद्रामध्ये झाली आहे. गर्भवती महिलांमध्ये एचआयव्हीचे सरासरी प्रमाण ०.२५ टक्के आहे. 

जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्‍टोबरपर्यंत ४४५ एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये २५ गर्भवती महिला आहेत. यामुळे या काळात १ टक्‍का एचआयव्ही रुग्णवाढीची सरासरी टक्केवारी आहे.
-डॉ. अनिल कडबू, जिल्हा एड्‌स नियंत्रण अधिकारी

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum 445 HIV positive