बेळगाव : गोवऱ्यांवरील अंत्यसंस्काराला पुन्हा विलंब

दुसऱ्यांदा डेडलाईन हुकली; विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे प्रशासनाकडून कारण
 स्मशानभूमीं
स्मशानभूमींsakal

बेळगाव : शहरातील दोन स्मशानभूमींमध्ये गोवऱ्यांवरील मोफत अंत्यसंस्कार करण्याच्या योजनेची डेडलाईन दुसऱ्यांदा हुकली आहे. ही योजना २५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे आधी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते, पण गोवऱ्या उपलब्ध नसल्याचे कारण देत योजनेचा प्रारंभ लांबणीवर टाकण्यात आला आहे.

दरम्यान, मेअखेरीस योजना सुरू करण्याचा निर्णय झाला होता, पण जून सुरु झाला तरीही अद्याप योजना सुरु झालेली नाही. आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण दिले जात आहे. बेळगाव शहरात अंत्यसंस्कारासाठी सध्या लाकडाचा वापर केला जातो. त्यासाठी होत असलेला खर्च पाहता गोवऱ्यांवरील मोफत अंत्यसंस्कार योजना कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. गोवऱ्यांवरील अंत्यसंसस्काराची योजना २०२१ मध्येच राबविण्यात येणार होती. जानेवारी २०२१ मध्ये महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी कोल्हापूर येथे जाऊन तेथील मोफत अंत्यसंस्कार योजनेची माहिती घेतली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात महापालिकेने अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५० लाख रुपये निधी राखीव ठेवला होता, पण मार्च २०२१ मध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे योजना लांबणीवर पडली.

निवडणूक झाल्यावर लगेचच कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाउन लागू झाला. त्यानंतर आर्थिक टंचाईचे कारण पुढे करून महापालिकेने योजना स्थगित ठेवली, पण २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पुन्हा या योजनेसाठी ५० लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. शिवाय, या योजनेची जबाबदारी एका सेवाभावी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. योजनेसाठी आवश्‍यक गोवऱ्या जमा करणे, गोवऱ्या साठविण्यासाठी शेड बांधणे ही कामे पूर्ण न झाल्याने योजना मेअखेरीस सुरू करण्याचा निर्णय झाला.

मात्र, मेमध्येच विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. निवडणूक झाल्यावरच योजनेची अधिकृत सुरुवात करण्याचा निर्णय झाला, पण काही दिवसांपूर्वी गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. योजनेसाठी आवश्‍यक गोवऱ्या आणून ठेवल्या आहेत. एक लाख गोवऱ्या आणल्या जाणार आहेत. पावसाळ्यात गोवऱ्या मिळत नसल्यामुळे साठवणूक केली जाणार आहे. सदाशिवनगर व शहापूर स्मशानभूमीत ही योजना राबविली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com